मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनाविषयीची उत्सुकता वास्तविक वाढली असताना, सध्या मात्र नाट्य परिषदेत वेगळेच नाट्य रंगले आहे. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीवर केलेल्या कथित आरोपांनंतर आता नाट्य परिषदेत वेगळाच अंक रंगला आहे.
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी नाट्य परिषद अध्यक्षांना बहुमत सिद्ध करण्याची दिलेली मुदत टळून गेली असून, आता १८ फेब्रुवारी रोजी नियामक मंडळाच्या सदस्यांनी यासंदर्भात विशेष बैठक बोलावली असल्याचे समजते. दरम्यान, नाट्य परिषद अध्यक्ष, तसेच कार्यकारिणी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही नाट्यवर्तुळात सध्या रंगली आहे. त्यामुळे नाट्य परिषदेत आता नक्की काय घडणार, याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागून राहिले आहे.