मुंबई - गुटखा विक्री तसेच पोलिस ठाण्यातच पार्टी करणाऱ्या सहा पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सशस्त्र पोलिस दलातील दोन पोलिसांसह भांडुप पोलिस ठाण्यातील चौघांचा यामध्ये समावेश आहे. विभागीय चौकशीअंती मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
भांडूप पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार सुनील कंक, पोलिस हवालदार शैलेश पाटोळे, मनोहर शिंदे हे पोलिस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) कक्षात पार्टी करताना आढळले. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ च्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत वरिष्ठांना समजताच सहायक पोलिस आयुक्तांनी तिघांविरोधात कारवाई करण्याबाबतचा अहवाल पुढे पाठवला. या कारवाईपाठोपाठ पोलिस पाटी लावून गुटखा विक्री करणाऱ्या मोसीम शरीफ शेख यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शेख हे सशस्त्र पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध पालघरच्या कासा पोलिस ठाण्यात २ लाख ८४ हजार रुपयांच्या गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. आहे. नायगाव येथील पोलिस शिपाई बाळू रामकृष्ण ढाकणे यांच्याविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
चौघांनाही आदेश पाठविलेपार्टी सुरू असताना पोलिस निरीक्षकाचे मदतनीस प्रेमचंद सावंत यांनीदेखील या तिघांना अडवले नाही. तसेच वरिष्ठांना याबाबत कळवले नाही. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. अखेर, विभागीय चौकशीअंती त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. चौघांनाही याबाबतचे आदेश पाठवण्यात आले आहे.