मुंबई : सुट्या पैशांसाठी आठ दिवसांपासून सुरू असलेला नोटकल्लोळ मुंबईत बुधवारीही कायम होता. बँक आणि एटीएमबाहेर लांबच लांब रांगा असून सर्वसामान्य माणूस हाराकिरीला आला आहे. तर धंद्याअभावी छोटे विक्रेते आणि फेरीवाल्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे.मुंबई शहरासह उपनगरांतील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असताना बाजारपेठांबाहेरील फेरीवाल्यांची बोहनी होणेही कठीण झाले आहे. एरव्ही ग्राहकांची बाजारपेठांहून अधिक पसंती बाजारपेठांबाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांसह उभ्या-उभ्या माल विकणाऱ्या विक्रेत्यांना असते. याशिवाय प्रत्येक बाजारपेठेबाहेर असलेल्या चहाच्या स्टॉलवरून बाजारपेठेतील गर्दीचा अंदाज बांधता येतो. कारण बाजारपेठेतील विक्रेत्यांपासून त्यांच्याकडे येणारे ग्राहक चहाच्या स्टॉलवर चहा पिताना हमखास दिसतात. मात्र सुट्या पैशांसाठी गेल्या आठवड्याभरापासून खर्चाला चाप लावलेले मुंबईकर क्वचितच बाजारपेठांत दिसत आहेत. परिणामी बाजारांवर जगणाऱ्या फेरीवाल्यांचेही मरण झाले आहे.दक्षिण मुंबईतील कपडा, भांडी, कटलरी, औषधे आणि इतर अनेक वस्तूंचे बाजार क्रॉफर्ड मार्केटसमोर आहेत. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत येथे ग्राहकांची गर्दी असते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सकाळी १० वाजल्यानंतर बाजार उघडत असून रात्री ९ वाजेपर्यंत या ठिकाणी शुकशुकाट होत असल्याची माहिती येथील फेरीवाले देत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुख्य बाजारपेठांतच शुकशुकाट असल्याने फेरीवाल्यांकडे कोणी फिरकतही नसल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)
नोटा काढण्यासाठी रांगांची दशमी!
By admin | Published: November 18, 2016 2:36 AM