मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेकॉर्डब्रेक मतदान झाल्याची माहिती आहे. मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून शासकीय यंत्रणांसह स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले होते. त्याचे फलित म्हणून मंगळवारी मतदानाचा टक्का चांगलाच वाढल्याचे दिसले. आपले कर्तव्य बजावत असताना अनेक अडचणी आणि त्रासाला मतदारांना सामोरे जावे लागले. कोठे यादीचा गोंधळ, कोठे भली मोठी रांग, युवक मतदारांचा उत्साह, ज्येष्ठ नागरिकांचा शिस्तपणा, निवडणूक अधिकाऱ्यांचा सूचना, कार्यकर्त्यांची धावपळ, याचाच धांडोळा टीम ‘लोकमत’ने घेतला आहे. मुंबईतील एकूण २४ वॉर्डमध्ये नेमका मतदान दिन कशाप्रकारे साजरा झाला, याचा हा वृत्तांत...
ए वॉर्ड दुपारनंतर मतदार केंद्र शांत!ए वॉर्डमध्ये उच्चभ्रू वस्ती आणि झोपडपट्टी असे दोन्ही विभाग एकत्र येतात. केवळ तीन प्रभागांचा समावेश असलेल्या या वॉर्डमध्ये सकाळी मतदानाचा उत्साह आणि दुपारनंतर शांतता असे चित्र दिसून आले. प्रभाग २२६ मधील काही मतदारांचे मतदान केंद्र के.सी. महाविद्यालय, एच.आर. महाविद्यालय होते. या महाविद्यालयांमध्ये सकाळी १० वाजल्यापासून मतदारांची गर्दी दिसून आली. उच्चभ्रू वस्तीमधील मतदार सकाळी मतदानासाठी उतरले होते. पण, दुपारी २ नंतर मतदारांची संख्या रोडावली.बी वार्डअतिसंवेदनशील बूथवरही शांततेत मतदानबी वॉर्डमध्ये येणाऱ्या दोन प्रभागांमध्ये काही अतिसंवेदनशील मतदान केंद्रे होती. पण, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गडबड-गोंधळ न होता सुरळीत मतदान पार पडले. या वॉर्डमध्ये भेंडीबाजार, पायधुनी या परिसरात असलेल्या अतिसंवेदनशील मतदार केंद्रांमध्ये पोलिसांची दिवसभर करडी नजर होती. या भागातील आॅर्किड इंटरनॅशनल स्कूल हे २२३ प्रभागाचे मतदान केंद्र होते. तर, त्याच्या पुढच्या गल्लीत असणारे दाऊदभाय फझलभाय स्कूल हे २२४ प्रभागाचे मतदान केंद्र होते. हे दोन्ही अतिसंवेदनशील मतदान केंद्र जवळ-जवळ असल्याने पोलिसांनी विशेष बंदोवस्त ठेवला होता.सी वार्डज्येष्ठांच्या मदतीसाठी कार्यकर्ते तत्पर सी वॉर्ड परिसरात सकाळपासूनच मतदानासाठी मतदार घरातून बाहेर पडले होते. सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत या परिसरात ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी उतरल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तत्पर दिसून येत होते.तीन प्रभागांच्या या वॉर्डमध्ये मिश्र भाषिक मतदार आहेत. फणसवाडी, ठाकूरद्वार, भुलेश्वर, चंदनवाडी परिसरातील मतदारांनी मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. झावबावाडी येथील रानडे शाळेत मतदान केंद्र हे पहिल्या मजल्यावर होते. त्यामुळे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मतदान खोलीत नेण्यासाठी लाकडी खुर्चीला बांबू बांधून डोली तयार करण्यात आली होती. ही डोली उचलण्यासाठी ४ वेगळ््या व्यक्ती तैनात केल्या होत्या. डी वॉर्ड युवा मतदारांची माघारया विभागातील जसलोक रुग्णालय, तीन बत्ती, मलबार हिल, महालक्ष्मी मंदिर, आॅपेरा हाऊस अशा उच्चभ्रू वसाहतीतील मतदारांनी मतदानाला अल्प प्रतिसाद दिला. विभागांमधील गावदेवी, गोवालिया टँक , गायवाडी, हैदराबाद इस्टेट, सिक्कानगर, क्रांतीनगर, ताडदेव, नवजीवन सोसायटी, चिखलवाडी सिमला नगर, मंगलवाडी या अन्य मध्यमवर्गीय वसाहतीतील जागरुक मतदारांनी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रांगा लावून मतदान केल्याचे दिसून आले. या विभागात एकूण ४०.५१ टक्के मतदान नोंदविण्यात आले. त्यात ६७ हजार ६४७ पुरुष आणि ५६ हजार ५२५ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला.काही प्रभागांमध्ये मतदान ओळखपत्र आणि अन्य ओळखपत्र नसल्याने युवा मतदारांना मतदान न करता माघारी परतावे लागले. या वॉर्डमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात नसलेल्या २१४ या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले मतदान हा दिवसभर चर्चेचा विषय ठरला.ई वॉर्ड दृष्टिहीन मतदारांसाठीच्या यंत्रणेचा अभावया प्रभागांमधील दृष्टिहीन मतदारांनी यंत्रणेविषयी नाराजी व्यक्त केली. बऱ्याच ठिकाणी दृष्टिहीन व्यक्तीसोबत एका व्यक्तीस सोबत जाण्यावरुन शाब्दिक वाद झाला. काही ठिकाणी या मतदारांना ताटकळत राहावे लागल्याने मतदान करण्याच्या प्रक्रियेविषयी त्यांनी निराशेचा सूर आळविला. भविष्यातील निवडणुकांमध्ये ही प्रक्रिया सुकर व्हावी, अशी आशा दृष्टिहीन मतदान जलील शेख यांनी व्यक्त केली. या वॉर्डमध्ये एकूण ५३.२८ टक्के मतदान झाले, तर या विभागातील २१३ प्रभागात सर्वांत कमी ४६.५१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. या विभागातील न्यू नागपाडा, दगडीचाळ, मदनपुरा, काजीपुरा, कामाठीपुरा, छोटा सोनापूर अशा भागांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून आला. पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार मिळाल्याने युवा मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर येऊन जल्लोष व्यक्त करत ‘सेल्फी’ही काढले. एरव्ही केवळ शेजाऱ्यांविषयी गप्पा मारणारा ‘गृहिणीं’चा वर्ग बऱ्याच मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या संपत्तीविषयी चर्चा करताना आढळून आला. प्रभाग क्रमांक २०८ मधील पूर्व भायखळा महापालिका शाळेतील मतदान केंद्रावर सकाळपासूनच गोंधळ होता. राणीबाग शेजारीच असलेल्या या केंद्रामध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मतदारांनी सकाळी साडेसात वाजण्याआधीच गर्दी केली होती. एफ वॉर्ड वाहतूक पोलिसांनी केले रांगेचे नियोजनस्थानिक शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेरच उघडपणे आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह सांगून मतदारांना मत देण्याचे आवाहन करत होते. चिंचपोकळी, लालबाग आणि परळमधील मतदार सकाळपासून मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे चित्र होते. परळ गावातील मतदारांनी सकाळी मतदानाकडे पाठ फिरवली होती. तर दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी केली. एरव्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन करणारे पोलीस मतदान केंद्रात दिसल्याने मतदारही तोंडात बोटे घालत होते. गेल्या दोन दिवसांपासून वाहतुकीऐवजी निवडणुकीचे काम करत असल्याचे एका पोलिसाने सांगितले.एफ उत्तर मतदारांचा संथ प्रतिसादसायन कोळीवाडा, वडाळा मिठा कोरबागार, माटुंगा या परिसरात मतदानाचा उत्साह तसा बेताचाच होता. एफ उत्तर विभागामध्ये सकाळी मतदारांची संख्या तुरळकच होती. सकाळी ११.३० वाजेपर्यंत त्यात फारसा बदल झाला नाही. दुपारनंतर येथील मतदान केंद्रावर मतदार हळुहळू वळू लागले. डॉ. आंबेडकर महाविद्यालय येथील पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र होते. तेथे कोणतीही सोय नसल्याने ज्येष्ठ व अपंग मतदारांची प्रचंड गैरसोय झाली. ८० वर्षांच्या एका वृद्ध महिलेला काठी टेकत जिने चढावे लागले. अशावेळी त्यांची पुरती दमछाक उडाली. तरीही त्यांनी मतदानाचा हक्क बजावला़जी वॉर्ड डोलीची घोषणा हवेतच...!ग्लोबमिल पॅसेज महापालिका शाळेत पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र असल्याने मतदारांना त्रासाला सामोरे जावे लागले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी आयोगाने डोलीची व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे जिने चढण्यास त्रास होत असल्याची तक्रार ज्येष्ठ करत होते. याप्रकरणी जी साऊथ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्येश्री कापसे यांना ‘लोकमत’ने संपर्क साधला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना डोलीची व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी फोनवरून दिले. येथील निवडणूक अधिकारी स्वत: ज्येष्ठांना आधार देत ईव्हीएम मशिनपर्यंत घेऊन जात होते. ना.म.जोशी मार्गावरील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्र हायस्कूलमध्ये पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र होते. मात्र निमुळत्या जिन्यांमुळे ज्येष्ठांसाठी विशेष व्यवस्था करता आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्येष्ठांसाठी विशेष व्यवस्था केल्याचे निवडणूक अधिकारी सांगत होते. प्रत्यक्षात तशी कोणतीही व्यवस्था याठिकाणी दिसली नाही. तरीही याठिकाणी मतदारांनी मतदानासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. जी उत्तर वार्डमतदारांचा उत्साहदादर, माहीम, धारावी अशा जी उत्तर विभागातील ११ प्रभागांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दादर येथील प्रभाग क्रमांक १९१ आणि १९२ मध्ये सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. दुपारनंतर ही गर्दी वाढत गेल्याचे चित्र होते. धारावीमध्ये ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उतरले. मतदान केंद्रांवर रांगेत उभे राहून ज्येष्ठ नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावत होते. मतदान केंद्रांवर कोणतीही सोय नसताना या ज्येष्ठ नागरिकांनी काठी टेकत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदार याद्यांमधील घोळही त्यांच्या या उत्साहावर पाणी फेरु शकले नाही. एच ईस्ट वॉर्ड याद्यांचा गोंधळ, तरीही मतदान जोरातमुंबई महापालिका निवडणुकीत यंदा चांगले मतदान झाले असले, तरी वांद्रे पूर्व, सान्ताक्रुझ पूर्व आणि विलेपार्लेच्या काही भागांत याद्यांच्या गोंधळामुळे उत्साहावर विरजन पडल्याचेच दिसून आले. अनेकांचे याद्यांमध्ये नसलेले नाव आणि जुन्या व नवीन याद्यांमध्ये नाव शोधताना लागत असलेला वेळ; यामुळे मतदान केंद्रांवर गोंधळ आणि रांगाच रांगा दिसत होत्या. तरीही या वॉर्डमध्ये दिवसभरात सुमारे ५0 टक्क्यांवर मतदान झाले. नवीन याद्यांमध्ये नाव नसल्याने जुन्या याद्यांमध्ये मतदार नावे शोधत होते. त्यामुळे मतदान होण्यास बराच वेळ लागत असल्याची माहिती निवडणूक कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. शिवसेनेचा गड असणाऱ्या मातोश्री परिसरात म्हणजेच प्रभाग ९३ मध्येही सकाळी ११.३0 वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाले. एका मतदान केंद्रावर नाव नसल्याने दुसऱ्या केंद्रावर नाव शोधण्यासाठीही काहीजण धडपड करत होते. प्रभाग क्रमांक ८७, ९0, ९२, ९४, ९५, ९६ मध्येही मतदानावेळी गोंधळात गोंधळ होता. बेहरामपाडा, भारतनगर, निर्मलनगर, सुभाषनगर या झोपडपट्टी परिसरात मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले होते़ याद्यांमध्ये नाव शोधण्यातच त्यांचा वेळ खर्ची गेल्याचे दिसले. के वेस्टकोळी बांधवांनी पारंपरिक वेषात कोळीवाड्यात प्रभाग क्रमांक ५९ मध्ये कोळी बांधवांनी पारंपरिक वेषात वेसावे येथील महापालिका शाळेत आणि सेंट अँथोनी शाळेत मतदान केले. येथील अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नसल्यामुळे वेसावकर मतदान न करताच नाराज होऊन परतले. येथील अल्पसंख्यांक बांधवांनी देखील येथील मतदान केंद्रावर गर्दी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत उपबंधक विष्णु दिगंबर कुंभेजकर(९२)हे आंधळे असून त्यांनी यारी रोड येथील पोशा नाखवा शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांनी अंधेरीतील चारबंगला येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.आर साऊथ चाळी, झोपड्यातील मतदार जोमातपश्चिम उपनगरातील आर-एस वार्डमध्ये गतवेळेच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढले असून त्यासाठी जुन्या चाळी, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीतील मतदारांना धन्यवाद द्यावे लागणार आहे. कारण त्यांच्या भागातील मतदान केंद्रांवर भर उन्हात लांबवर रांगा, तर उच्चवर्गीय वस्ती असलेल्या ठिकाणची मतदान केंद्रे सूनसान पडल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले. कांदिवलीतील आकुर्ली रोडवरील शारिरीक शिक्षण महाविद्यालय आणि संभाजीनगर मराठी शाळा परिसरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा कायम होत्या. ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडणे, मतदार यादीतील नावाचा घोळ, किरकोळ कुरबुरी आणि समतानगरातील समता विद्यामंदिरामध्ये एका महिलेचे बोगस मतदान झाल्याची घटना वगळता, या वॉर्डातील मतदान सुरळीतपणे पार पडले. कांदिवली पूर्वेमधील वार्ड क्रमांक २४ मध्ये सकाळपासून संथगतीने मतदान सुरु होते. सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत सरासरी ९ टक्के मतदान झाले. एच वेस्ट उच्चभ्रू वस्तींमध्ये समाधानकारक मतदानवांद्रे पूर्व व सांताक्रुझ पूर्व या परिसरात याद्यांचा गोंधळ असतानाही मतदान चांगले झाले. तर एच वेस्ट हा वांद्रे पश्चिम ते सांताक्रुझ पश्चिम व विलेपार्लेचा काही भाग येणाऱ्या परिसरात समाधानकारक मतदान झाले. उच्चभ्रूच्या वसाहती अशी ओळख असणाऱ्या परिसरात दुपारपर्यंत साधारपणे १५ टक्के मतदान झाले होते. येथील खिरा नगर, मुक्तानंद पार्क ते सांताक्रुझ बस डेपो परिसर असणाऱ्या प्रभाग क्रमांक ९७ चे मतदान साने गुरुजी विद्यामंदिरमध्ये झाले. खिरा नगर, मुक्तानंद पार्क, नवयुग कॉलनी ते सांताक्रुझ बस डेपो परिसर यामध्ये येतो. दुपारी साडे बारापर्यंत अवघे दहा टक्के मतदान येथे झाले. त्यानंतर प्रभाग ९८ या वेलिंग्टन जिमखाना, खार जिमखाना, रोटरी पार्क, प्रभाग क्रमांक ९९ मधील खारदांडा, दांडा व्हिलेज, गोविंद नगर, कोळीवाडा, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक १00 मध्ये पाली व्हिलेज, पटवर्धन पार्क, युनियन पार्क, पाली हिल तसेच प्रभाग १0१ मधील वांद्रे तलाव, नॅशनल लायब्ररी आणि प्रभाग १0२ मधील संतोष नगर, वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रा बस डेपो या परिसरातही मतदान दुपारी तीनपर्यंत साधारपणे १0 ते १२ टक्के झाले होते.के ईस्टकुठे उत्साह, कुठे निरूत्साहकाहीशा पश्चिम उपनगरासह मध्य पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोडणाऱ्या के-ईस्ट प्रभागात सकाळी मतदानाचा उत्साह संचारला होता. प्रभाग क्रमांक ७२ मध्ये इस्माईल युसुफ कॉलेज, बांद्रेकरवाडी आणि लक्ष्मीनगरमधील मतदान केंद्रावर उत्साह संचारला होता. प्रभाग क्रमांक ७३ मध्ये मजास बस डेपो, जोगेश्वरी गुंफा येथे सकाळी मतदारांचा उत्साह पाहण्याजोगा होता; मात्र दुपारी उन्हाच्या कडाक्यात उत्साहावर काहीसे पाणी फेरले होते. प्रभाग क्रमांक ७५ मध्ये सेव्हन हिल रुग्णालय, मरोळ डेपो आणि विजयनगर परिसरात सकाळी आणि सायंकाळी मतदारांमध्ये उत्साह संचारला होता. प्रभाग क्रमांक ७६ मध्ये सीप्झ, मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये मात्र काहीसा निरुत्साह असल्याचे चित्र होते. प्रभाग क्रमांक ८१ मध्ये एमआयडीसी आणि मरोळ डेपो परिसर वगळता उर्वरित परिसरात काहीसा निरुत्साह होता. प्रभाग क्रमांक ८५ मध्ये विलेपार्ले आणि प्रभाग क्रमांक ८६ मध्ये छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार गाव येथे दुपारी शांत वातावरण होते. एल वॉर्ड : एल वार्ड मधील चुनाभट्टी ते चांदिवली परिसरातील मतदारांनी शांततापूर्वक मतदान करत लोकशाहीतील आपले कर्तव्य पूर्ण केले. काही मतदान केंद्रावर मतदारांसाठी प्रशस्त व्यवस्था होती. तर काही केंद्रांवरील गैरसोयींमुळे १६ प्रभागांतील या वॉर्डात ‘कही खुशी, कही गम’ अशी संमिश्र प्रतिक्रिया मतदारांमध्ये उमटली. ‘पिण्याच्या पाण्यापासून ते मतदार याद्यातील गोंधळा’पर्यंत आणि ‘रांगेपासून चिंचोळ्या जागेतील मतदान केंद्र’ अशा समस्यांमुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. सर्वाधिक उमेदवार म्हणून चर्चेतील प्रभाग १६४, कमानीमध्ये बैलबाजार निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रभाग १६९ शिवसृष्टी मध्ये मतदान केंद्र शाळेच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठ आणि अपंग मतदारांनी नाराजी व्यक्त केली. संवेदनशील मतदान केंद्र समजले जाणारे कुर्ला पश्चिमेतील प्रभाग १६७-मोरेश्वर महापालिका शाळा, १६८-कपाडिया नगर येथे पोलिसांच्या खड्या पहाऱ्यामुळे मतदान सुरळीत पार पडले. एम पश्चिम : चेंबूरच्या अनेक उच्चभ्रू भागात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. येथील सुभाष नगर, सिंधी सोसायटी, नवजीवन सोसायटी याठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या़ झोपडपट्टी भागांमधील मतदारांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. मतदार याद्यांमधील गोंधळ वगळता या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.एम पूर्व : मानखुर्द परिसरात राहणाऱ्या कौशल्या इरकर या महिलेच्या मतदार ओळखपत्रावर बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलेचा फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत त्यांना मतदानापासून अडवले. दुसरा ओळखपत्र पुरावा नसल्याने अखेर मतदान न करताच इरकर यांना परतावे लागले. या प्रकाराची विभागात चर्चा होती.एन वॉर्ड : आधीच गरमी त्यात भल्यामोठ्या रांगा आणि भरीस भर म्हणून मतदार यादीतील घोळामुळे एन वॉर्डमधील मतदार चांगलेच त्रस्त झाले होते. काही ठिकाणी गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले. परंतु, पोलिसांच्या सावधानतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. तासंतास रांगेत उभे असलेल्या मतदारांसाठी काही केंद्रांवर पाण्याची सोयही नव्हती. बुथ क्रमांक ९ मधील ईव्हीएमच बंद पडली. त्यामुळे मतदारांनी गोंधळ घातला. पी साऊथ : दुपारचे कडक ऊन, घामाने डबडबलेले मतदार तरी देखील मतदानाचा उत्साह मात्र कमी झाला नव्हता. हे चित्र गोरेगावच्या पी दक्षिण विभागात पहावयास मिळत होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच प्रभाग क्रमांक ५० ते ५८मध्ये मतदारांनी मोठी गर्दी केली होती. ज्येष्ठ नागरिकांचा समावेश मोेठा होता. पी नॉर्थ : या वॉर्डमधील यंदाच्या नवीन आरक्षणाप्रमाणे मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ८ प्रभागांतील मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होती. मढ भाटी, मालवणी, मनोरी येथे कोळी बांधवांनी आपल्या पारंपारिक वेषात मतदान केले. तर मालवणी येथे अल्पसंख्याक मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी होती. मालाड(प)येथील चिल्ड्रन वेल्फेअर कायदा महाविद्यालयाचा पहिल्या वर्षाचा तृतीय पंथीय विद्यार्थी पवन यादव(२१) याने गोरेगांव(पूर्व) येथील गोकुळधाम महापालिका शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. तर सकाळपासून तुरळक गर्दी असलेल्या दिंडोशी वसाहत महापालिका शाळेत दुपारी मात्र मतदानास गर्दी झाली होती.आर नॉर्थ : दहिसर, आयसी कॉलनी, कांदरपाडा, दहिसर चेक नाका , गणपत पाटील नगर, बोरीवली आरटीओ, केतकी पाडा, धारखाडी, डायमंड इंडस्ट्रीयल इस्टेट, वैशाली नगर, कोकणी पाडा, एकता नगर, रावळपाडा, अशोकवन, चोगले नगर, गणेश नगर, चिंतामणी नगर, एसटी डेपो, रतन नगर, आंबेवाडी, ओवरी पाडा, मराठा कॉलनी, मानव कल्याण केंद्र, दहिसर नदी, भगवती हॉस्पिटल, एलआयसी कॉलनी आदी भागाचा समावेश असणा-या आर नॉर्थ वॉर्डात सकाळपासूनच मतदानाची लगबग पाहायला मिळाली. आजवर शिवसेनेचे प्राबल्य असणाऱ्या या भागात यंदा चुरस असल्याने मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी शिवसेनेने जोरदार फिल्डिंग लावली होती. आर सेंट्रल : यंदा निवडणूक आयोगाने मतदान केंद्राबाहेर सर्वच उमेदवारांच्या कुंडल्या लावल्या होत्या. उमेदवाराचे शिक्षण, आर्थिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यात जाहीर करण्यात आली होती. मतदारांसाठी ही माहिती किती उपयुक्त ठरली त्याचा केवळ अंदाजच करता येतो. मात्र आर सेंट्रल वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १७ मधील अपक्ष उमेदवार मीरा कामत यांना मात्र या कुंडली भलताच मनस्ताप झाला. ता प्रभागातील मतदान केंद्रांसमोर उमेदवारांच्या ज्या कुंडल्या मांडण्यात आल्या त्यात मीरा कामत यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे म्हटले होते, प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत कोणत्याच न्यायालयाने आपल्याला अशी कोणती शिक्षा सुनावली नाही. आयोगाच्या होर्डिंगवर चुकीची माहिती असल्याचा दावा कामत यांनी केला. निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यात बदल होत नसल्याने कामत भलत्याच वैतागल्या आणि त्यांचा त्रागा परिसरातील चर्चेचा विषय बनला. दरम्यान आर सेंट्रलमधील प्रभाग क्रमांक ९ ते १८ मध्ये शांततेत मतदान पार पडले.एस वॉर्ड : भांडुप, कांजुर, विक्रोळी, पवई परिसरात सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. झोपडपट्टी परिसरातील मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. त्यात काही ठिकाणी तर मतदारांसाठी रिक्षा सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र बऱ्याच ठिकाणी मतदारांचे नावच सापडत नसल्याने त्याने परत मागे जाण्यास पसंती दर्शवली. मतदारांच्या नावांसाठी त्यांची धावपळ सुरु असलेली दिसून आली. गहाळ झालेली मते आपली तर नाही ना, या विचाराने त्यांच्या डोक्यातील टिकटिक वाढली आहे. भांडुपच्या जिजामाता, मंदार शाळेतील केंद्रात ढिसाळ नियोजनामुळे कुठे मतदान करायचे हेच मतदारांना समजत नव्हते. कांजुर आणि विक्रोळीतही हीच परिस्थिती अनुभवायला मिळाली. सुमारे १५ ते २० हजार मतदारांचे नाव गायब असल्याची ओरड या भागांतून ऐकू आली. त्यात संतप्त मतदारांनी याचा विरोध करत केंद्र बंद पाडण्याचा प्रयत्न केला.टी वॉर्ड : मुलुंड पूर्वेकडील तरुण उत्कर्ष शाळेतील मतदान केंद्रात मतदान सुरु झाल्यापासूनच गोंधळाची सुरुवात झाली. मतदार यादीतून नावच गायब झाल्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. अशात खासदार किरीट सोमय्या यांनीही रांगेत न जाता थेट आतमध्ये प्रवेश केल्यामुळे मतदारांच्या रागात भर पडल्याचीही परिस्थिती या ठिकाणी ओढावली होती. रांगेत बराच वेळ उभे राहून मतदानाची वेळ आली तेव्हा आपल्या नावाने आधीच मतदान झाल्याचे प्रकारही या केंद्रात घडले. यावेळी सुर्यकांत यादव सोबत हा प्रकार घडला. त्याने पर्यायी मतदान न करताच तेथून निघून जाणे पसंद केले. धिम्या गतीने सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेमुळे मतदार वैतागले असताना येथील वीज गेली. त्यामुळे तेथील उमेदवाराने भाजप आमदार सरदार तारासिंग यांना बोलावून घेतले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही बाब अन्य पक्षांच्या कार्यकत्यांनी त्यांना घेराव घातल्याने तणावात भर पडली. तर मुलुंड पूर्वेकडील पोस्ट आॅफीस इमारतीतील सर्वच रहिवाशांची नावे गहाळ झाली होती.