नव्या नोटांसाठी चोहीकडे रांगाच रांगा!

By admin | Published: November 11, 2016 03:57 AM2016-11-11T03:57:30+5:302016-11-11T03:57:30+5:30

चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा मंगळवारी रात्री शासनाने बंद केल्यानंतर सर्वसामान्यांपासून सर्वच स्तरातील नागरिकांचे जनजीवन दोन दिवस

Range for new notes! | नव्या नोटांसाठी चोहीकडे रांगाच रांगा!

नव्या नोटांसाठी चोहीकडे रांगाच रांगा!

Next

मुंबई : चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा मंगळवारी रात्री शासनाने बंद केल्यानंतर सर्वसामान्यांपासून सर्वच स्तरातील नागरिकांचे जनजीवन दोन दिवस ठप्प पडले होते. मात्र गुरुवारी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा बाजारात अवतरल्या. तसे सुट्या पैशांची चणचण भागवण्यासाठी व जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मुंबईकरांनी सर्वच बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या.
मुंबईसह देशातील सर्व बँक गुरुवारी ठरलेल्या वेळेच्या एक तास आधी उघडणार असल्याचे शासनाने बुधवारी जाहीर केले होते. त्याप्रमाणे बहुतांश बँक गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून खुल्या झाल्या. मात्र घाबरलेले आणि गोंधळलेल्या मुंबईकरांनी सकाळी आठ वाजल्यापासूनच बँकेबाहेर रांग लावली होती. काही ठिकाणी एटीएम सुरू होतील, असेही प्रशासनाने सांगितले होते. मात्र मुंबईत कुठेही एटीएम सुरू असल्याचे दिसले नाही. त्यामुळे पैसे काढण्याचा सर्व भार बँकांना सहन करावा लागला.
बँकेमध्ये खात्यात पैसे भरणारे आणि पैसे काढणाऱ्यांहून अधिक गर्दी ही नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे बँकेबाहेरील गर्दी कमी करण्यासाठी बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ इंडिया आणि विविध बँक प्रशासनांनी नोटा बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकांना प्राधान्य दिले. कमाल चार हजार रुपयांच्या किमतीच्या नोटा बँक प्रशासनाकडून बदलून देण्यात येत होत्या. मात्र प्रत्येक बँक संबंधित व्यक्तींकडून एका अर्जासोबत ओळखपत्राची नक्कल प्रत घेत होती. या प्रत्येक अर्जाची नोंद बँक कर्मचारी त्या-त्या वेळी करत होते. 

बँक आॅफ महाराष्ट्रच्या भायखळा शाखेने सकाळी एक तास आधीच बँक उघडली. मात्र पाचशे रुपयांच्या नोटा येण्यास उशीर लागल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत बँक प्रशासन खातेधारकांकडून केवळ पैसे स्वीकारत होते, तर दुपारी ३ वाजल्यानंतर बँक प्रशासनाने खातेधारकांना कमाल १० हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्यास परवानगी दिली.
नोटा बदलणाऱ्यांनाही कमाल ४ हजार रुपयांच्या नोटा बदलता आल्या. नागरिकांच्याय सोयीसाठी एरव्ही सायंकाळी ४ वाजल्यांतर बंद होणारे व्यवहार बँकेने सायंकाळी ५ वाजल्यानंतरही सुरू ठेवल्याचे प्रबंधक आशिष शेट्टी यांनी सांगितले.


बँकेतील गर्दी
कमी होणार!
खातेधारकांना स्वत:च्या नावाच्या धनादेशावर (बेरर चेक) कमाल १० हजार रुपयांची रोख देण्यात येत होती. त्यामुळे गुरुवारी मोठ्या संख्येने नागरिकांच्या हाती ५०, १०० आणि २ हजार रुपयांच्या नोटा प्राप्त झाल्या असून त्याचा परिणाम शुक्रवारी दिसून येईल. शिवाय शुक्रवारपासून एटीएम सेवा सुरू होणार असल्याने बँकांमधील गर्दीही कमी होईल, असा दावा बहुतेक बँक अधिकाऱ्यांनी केला आहे.

Web Title: Range for new notes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.