मेट्रोच्या तिकिटासाठी रांगेचे टेन्शन दूर!
By admin | Published: February 26, 2015 01:32 AM2015-02-26T01:32:49+5:302015-02-26T01:32:49+5:30
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत आता कॉम्बो कार्ड दाखल झाले आहे. हे कार्ड बँकांशी संलग्न असलेल्या डे
मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत आता कॉम्बो कार्ड दाखल झाले आहे. हे कार्ड बँकांशी संलग्न असलेल्या डेबिट आणि क्रेडिट अशा दोन्ही प्रकारांत असून, या कार्डमुळे मेट्रो प्रवाशांना आता प्रवास करताना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.
मेट्रो प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) कॉम्बो कार्डची सेवा सुरू केली आहे. हे कॉम्बो कार्ड मिळविण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआयच्या शाखांसह बँकांच्या ग्राहक केंद्रांमध्ये अर्ज करता येईल. याच बँकांच्या शाखांतून प्रवाशांना कॉम्बो कार्ड वितरित होईल. महत्त्वाचे म्हणजे या कार्डमध्ये आॅटो रिलोड सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे जेव्हा एखादा प्रवासी आॅटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीमवर कॉम्बो कार्ड पंच करेल, तेव्हा त्यातील रक्कम जर ५० रुपयांपेक्षा खाली आली असेल तर आॅटोमॅटिकली ते कार्ड रिलोड होत त्यात २०० रुपये एवढी रक्कम भरली जाईल. परिणामी कार्डधारी प्रवाशाला मेट्रोने प्रवास करताना तिकिटांच्या पैशांबाबत प्रत्येक वेळी कार्डमध्ये किती पैसे शिल्लक आहेत, हे तपासण्याची गरज भासणार नाही. मेट्रोच्या १२ स्थानकांवरील आॅटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीमवर प्रवाशांना हे कार्ड वापरता येणार असून, मात्र त्याचा वापर करताना प्रवाशांचे बँकेत खाते असणे अनिवार्य असणार आहे. (प्रतिनिधी)