मुंबई : ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’, या वाक्यामुळे घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी, लेखक व कवी विद्याधर ऊर्फ आबासाहेब करमरकर (९६) यांचे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.
विलेपार्ले येथील तेजपाल स्कीम इमारतीत ते कुटुंबीयांसमवेत राहात होते. त्यांचे पुत्र संजय करमरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी वृद्धापकाळाने आबासाहेबांचे निधन झाले. ते आजारी नव्हते. पण, वर्षभरापासून दमा, कफ आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. करमरकर यांनी कलाक्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसह मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. कार्तिक कॉलिंग कार्तिक, एक थी डायन, गेम, सांस बहू और सेन्सेक्स, लंच बॉक्स, तुम्हारी सुलू, विरे की वेडिंग हे त्यांचे अलिकडचे चित्रपट होते. दोस्ती... यारियां... मनमर्जियां या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. आघाडीच्या ब्रँडच्या जाहिरातींचा प्रमुख चेहरा म्हणूनही त्यांची ओळख होती.