रंगकर्मी राजन पाटील यांची ‘चुकलेल्या संवादाची’ गोष्ट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:18 AM2020-11-22T09:18:45+5:302020-11-22T09:18:45+5:30
राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या व अशा अनेक गाजलेल्या नाटकांतील ...
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या व अशा अनेक गाजलेल्या नाटकांतील ज्येष्ठ रंगकर्मी; तसेच ‘माझी माणसं’, ‘रंग माझा’ अशा पुस्तकांचे लेखक राजन पाटील यांना अचानक नैराश्याने ग्रासले; परंतु या स्थितीवर मात करण्यासाठी विविध रंगांचे लेपन करून आविष्कृत झालेल्या त्यांच्या माणसांच्या भूमिकाच त्यांच्या उपयोगी पडल्या. परिणामी, राजन पाटील यांनी त्यांच्यातल्या ऊर्जेला खतपाणी घालत पुन्हा सकारात्मकतेची कास धरली आणि एका ‘चुकलेल्या संवादाची’ गोष्ट पूर्णत्वास गेली.
राजन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि एका ‘चुकलेल्या संवादाची’ ही गोष्ट घडली. या पोस्टमुळे त्यांचे चाहते, हितचिंतक व नाट्यसृष्टीतील मंडळींना मोठा धक्काच बसला. माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्रे टाकली आहेत. मानसिकदृष्ट्या मी हरलोय. माझे जगणे आता जगणे उरले नाही, अशा आशयाची त्यांची पोस्ट वाचून अनेक जण अचंबित झाले. कारण उमद्या स्वभावाचे आणि लढाऊ बाण्याचे व्यक्तिमत्त्व म्हणून राजन पाटील यांची सर्वांना ओळख आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडला. याचा सकारात्मक परिणाम या संवेदनशील रंगकर्मीच्या मनावर झाला आणि आपला एकंदर ‘संवाद’ चुकला याची राजन पाटील यांना खात्री पटली.
माझ्या आयुष्यात ‘तो’ क्षण आला आणि सर्वकाही असह्य झाले. पराभव समोर उभा राहिला. पण तुम्ही सगळे त्यावर इतक्या त्वेषाने व्यक्त झालात की माझ्यावरच्या त्या क्षणाची पकड क्षणात सुटली. खाडकन मुस्कटात बसल्यानंतर जाग यावी तसा भानावर आलो, असे म्हणत राजन पाटील यांनी त्यांच्या चाहत्यांना नंतर सलाम ठोकला. काही वर्षांपूर्वी त्यांना झालेल्या एका आजारातून ते बाहेर पडले असले, तरी सध्या ते अजून एका व्याधीने ग्रस्त आहेत. याचा परिणाम म्हणूनच एका अनाहूत क्षणी त्यांना नैराश्य आले असावे, असा सूर या घटनेनंतर नाट्यसृष्टीत उमटला. पण सध्या मात्र त्यांच्यात नव्याने निर्माण झालेल्या सकारात्मकतेमुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
चौकट:
पुन्हा हत्यार उपसले आहे...
चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहून मी स्वतःला खडसावले. लोक तुला बघून, तुला आदर्श मानून हरणारी लढाईसुद्धा लढतात आणि प्रसंगी जिंकतातही आणि तू? तुला लढायला हवे, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तू? फसवणार? आता माघार नाही. शेंडी तुटो वा पारंबी; पण लढाई सोडायची नाही. आता मी पुन्हा हत्यार उपसले आहे, अशा शब्दांत या एकूणच घटनेनंतर राजन पाटील सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत.