लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खुल्या आसमंताखाली केली जाणारी महानाट्ये म्हणजे नाट्यसृष्टीतील भव्यदिव्य प्रयोग! प्रचंड मेहनत आणि फौजफाटा घेऊन सादर होणाऱ्या या महानाट्यांनाही गेल्या दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाचा फटका बसला आहे. ज्याप्रमाणे नाट्यगृहे बंद झाली; त्याचप्रमाणे या महानाट्यांवरही पडदा पडला. त्यामुळे मोठ्या संख्येने महानाट्यांवर अवलंबून असलेले कलावंत, पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ आदी मंडळींची स्थिती बिकट झाली. निदान पावसाळ्यानंतर तरी महानाट्यांच्या सादरीकरणाला परवानगी मिळेल, अशा अपेक्षेत सध्या हे रंगकर्मी आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी महानाट्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर अनेक रंगकर्मींनी महानाट्याची परंपरा पुढे चालवण्यात हातभार लावला. मोकळ्या मैदानात, रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत होणारे नाटक म्हणून महानाट्यांचे वेगळेपण आकर्षित करते. मात्र, गेले दीड वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या महानाट्यांवर पूर्णतः पडदा पडला आहे. साहजिकच, महानाट्यांशी संबंधित असलेल्या सर्व रंगकर्मींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ‘शिवायन’ या ऐतिहासिक महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक व अभिनेते सात्विक ठकार; तसेच या महानाट्याचे निर्माते मयूर घोलप यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवले आहे. पावसाळ्यानंतर तरी संपूर्ण खबरदारी घेऊन महानाट्यांचे सादरीकरण करण्याबाबत चर्चेची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांच्या ‘शिवायन’ या महानाट्यातील मंडळींसह ‘शंभूराजे’, ‘शिवगर्जना’, ‘मराठ्यांची गौरवगाथा’ या आणि अशा महाराष्ट्रातील इतर अनेक महानाट्यांतील रंगकर्मींनी यासाठी एकजूट केली आहे.
चौकट:-
महानाट्यांचा संसार पूर्णपणे थांबलाय...
महानाट्यांमध्ये शंभर-दीडशे कलाकारांसह हत्ती, घोडे, बैलगाड्या; तसेच वेशभूषा, कपडेपट, ध्वनी, नेपथ्य, प्रकाशयोजना यासाठी लागणारा मोठा लवाजमा असतो. गेले दीड वर्ष महानाट्यांचा संसार पूर्णपणे थांबला आहे. ही सर्व मंडळी अजूनही मदतीच्या बाबतीत वंचित आहेत. महानाट्याची प्रेक्षकसंख्या जास्त असली, तरी शासनाने पावसाळ्यानंतर सुयोग्य नियमावलीसह महानाट्यांच्या सादरीकरणाला परवानगी द्यावी, अशी आमची विनंती आहे.
- सात्विक ठकार, रंगकर्मी, ‘शिवायन’ महानाट्य
सोबत : ‘शिवायन’ महानाट्यातील एक प्रसंग.