लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: सध्याच्या अनलॉकच्या प्रक्रियेत जीवनमान हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असली, तरी नाट्यगृहे मात्र अद्याप बंद आहेत. नाट्यगृहांवरचा पडदा कधी उघडणार, याबाबत अनिश्चितता असून, त्याचे पडसाद आता नाट्यसृष्टीत उमटू लागले आहेत. यातच भर पडली आहे, ती अलीकडेच नाशिकच्या कालिदास नाट्यगृहात राजकारणी मंडळींनी घेतलेल्या कार्यक्रमाची!
एकीकडे नाट्यगृहे बंदचे आदेश असताना असा कार्यक्रम कसा घेतला जातो, असा सूर याबाबत आता नाट्यसृष्टीत उमटू लागला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांनी सोशल मीडियावर या संदर्भाने शाब्दिक फटकारे ओढले आहेत आणि त्यावर काही कलावंत प्रतिक्रियाही देत आहेत. तर दुसरीकडे काही रंगकर्मींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाट्यगृहे सुरू करण्याची विनंती केली आहे. या निमित्ताने रंगकर्मींमध्ये एकजूट झाल्याचे चित्र असून आता नाट्यगृहे सुरू करा, अशी एकमुखी मागणी केली जात आहे.
चौकट १:
नाट्यसृष्टी नेतृत्त्वहीन झाली आहे.
नाट्यगृहे नाटकांसाठी असतात; पण या व्यतिरिक्त तिथे बरेच काही चालते, चालवून घेतले जाते आणि याचे कारण म्हणजे नाट्यसृष्टीला कणखर व खंबीर नेतृत्व नाही. या सर्व प्रकारामुळे आज मराठी नाट्यसृष्टी नेतृत्त्वहीन होऊन दुबळी झाली आहे. नाशिकमध्ये पार पडलेल्या त्या सभेवर टीकेचे आसूड ओढण्याचे धाडस आपल्यातल्या किती महान कलावंतांनी दाखवले? आणि नसेल तर का नाही दाखवले? एकूण काय, तर हे सर्व प्रश्न ठामपणे विचारून त्याचा परिणाम नाट्यसृष्टीच्या भल्यासाठी करून घेणारे नेतृत्व आज आपल्याकडे नाही. आपण केवळ वर्गणी काढून आपल्या बॅकस्टेज कलाकारांना मदत करत राहू या. सध्या तेवढेच आपल्या हातात आहे.
चौकट २
'थिएटर' ही अधिक सुरक्षित जागा.
कोरोनाच्या संकटाने आर्थिक प्रश्न जसे निर्माण केले, तसेच मानसिक प्रश्नही गंभीर केलेले आहेत. प्रायोगिक रंगभूमीवर केवळ २५-३० लोकांसमोर काहींनी अतिशय सुरक्षित आणि यशस्वीरीत्या प्रयोग केले. सभा, समारंभ, मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा 'थिएटर' ही अधिक सुरक्षित जागा आहे. त्यामुळे निदान ५० लोकांकरिता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला तरी परवानगी मिळावी, अशा आशयाचे पत्र अतुल पेठे, शंभू पाटील, वामन पंडित, दत्ता पाटील, अभिजित झुंजारराव, अनिल कोष्टी आदी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या रंगकर्मींनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
सोबत : पुरुषोत्तम बेर्डे यांचा फोटो.