राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रंगकर्मींच्या विविध मागण्यांसाठी 'रंगकर्मीं आंदोलन, महाराष्ट्र' या मंचाखाली एकवटलेले रंगकर्मी आता पितृपक्षाच्या निमित्ताने 'पितृस्मृती आंदोलन' करण्याच्या पवित्र्यात आहेत. रंगकर्मींच्या संदर्भात जो विचार पितरांचा होता; त्या कलाप्रेमी पितरांनाच आता साकडे घालण्यासाठी पितृपक्षातील सोमवारी, म्हणजे २७ सप्टेंबरला हे रंगकर्मी विविध जिल्ह्यांत हे आंदोलन करणार आहेत.
मुंबईतील रंगकर्मी या दिवशी शिवाजी पार्क येथे जमून पितृपक्ष श्राद्ध घालणार आहेत.
अनलॉकच्या प्रक्रियेत बरीच क्षेत्रे टप्याटप्याने कार्यरत करण्यात आली, तरी सांस्कृतिक क्षेत्राकडे दुर्लक्ष केले जात आहे. रंगकर्मींच्या काही कलांना सादरीकरणासाठी तत्काळ परवानगी देऊन टप्प्या-टप्प्याने इतर कलांनाही संमती देता येईल, हा विचार शासनाच्या ध्यानीमनी नाही. असा विचार ज्या पितरांचा होता; त्या पितरांच्या स्मृती जागवण्याच्या भूमिकेतून हे रंगकर्मी आता पितृस्मृती महाआंदोलन करण्यासाठी सरसावले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या रंगकर्मींनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्टला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ‘जागर रंगकर्मींंचा’ हे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत सांस्कृतिक मंत्र्यांनी रंगकर्मींच्या शिष्टमंडळाला भेटीला बोलावले होते. त्यात रंगकर्मींच्या मागण्यांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली. मात्र, अद्याप त्यासंबंधीचा लेखी आदेश काढण्यात आलेला नाही, अशी माहिती 'रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र'तर्फे देण्यात आली.
त्यानंतर, या रंगकर्मींनी ३० ऑगस्टला नाट्यगृहे व चित्रपटगृहे लवकर सुरू करावीत, यासाठी नटराजाची महाआरती करून शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले. दरम्यानच्या काळात, ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरू केली जातील, असे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले. परंतु, ५ नोव्हेंबर नव्हे; तर लवकरात लवकर नाट्यगृहे सुरू केली जावीत, अशी या मंचाची मागणी आहे.
चौकट:-
आम्हाला कुणी वालीच उरला नाही...
- विजय पाटकर (ज्येष्ठ रंगकर्मी व प्रमुख कार्यकर्ते, 'रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र')
दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर यांच्यासारखे जे पितामह कलाक्षेत्रात होऊन गेले, त्यांना आम्ही पितृस्मृती आंदोलनाच्या निमित्ताने साकडे घालत आहोत. कारण सध्या आम्हा रंगकर्मींना कुणी वालीच उरलेला नाही, अशी आमची भावना आहे.