मुंबई : तांत्रिक कौशल्य, कल्पनाशक्ती, अचूकता, चिकाटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीमवर्क यांचा कस पाहणारी 'बोईंग नॅशनल एरोमोडेलिंग स्पर्धा' गुरुवारी आयआयटीच्या पवईच्या मोकळ्या आकाशात रंगली. देशभरातून जवळपास ८५ टीम यात सहभागी झाल्या होत्या.आयआयटी टेकफेस्ट अंतर्गत ड्रोन आणि एरोमोडेलिंग स्पर्धेचे आयोजन केले जाते. मुले हलके लाकूड किंवा पॉलिमर, बॅटरी वापरून रिमोट कंट्रोलवर उडणारी विमाने तयार करतात. दिवसरात्र खपून तयार केलेल्या एरोमॉडलिंगच्या छंदामुळे मुलांच्या बुद्धीमत्तेबरोबरच अनेक गुणांचा कस लागतो. महाराष्ट्रासह देशभरातून टीम यात सहभागी झाल्या होत्या.
मुलांना वजनाने अवघे एक किलो भरेल असे मॉडेल तयार करायचे असते. तसेच किमान ३० सेकंद हवेत सरळ रेषेत आणि घिरट्या घालत उडवायचे आव्हान पेलायचे असते. पण यासाठी ठाकूर कॉलेजची प्रसाद स्वामी आणि मित्रांची टीम दोन महिने खपत होती. तर नवी मुंबईच्या कॉलेजातून आलेले स्वप्निल आणि त्याचे मित्र गेले वर्षभर यावर काम करत होते. त्यांनी तयार केलेले काही मॉडेल फसले. आताही त्यांचे मॉडेल वजनाच्या कसोटीवर उतरले होते. पण हवेत तग धरेल का, लँडिंग करताना विमान नाकावर नाही ना आपटणार या काळजीत तो आणि त्याची टीम होती.
मँगलोरच्या एनआयटीके कॉलेजची अनन्या आणि तनय मूळचे मुंबईचे. त्यांच्या टीमने तयार केलेली दोन्ही मॉडेल दुसऱ्या फेरीत गारद झाली. एकाच्या पंखांचे कनेक्शन तुटल्याने ते आयत्यावेळेस उडू शकले नाही. तर दुसऱ्याने लँडिंग करताना नाक टेकले. ही मुले खरेतर कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, केमिस्ट्री अशा वेगवेगळ्या विषयात शिकणारी. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमधली फारच कमी मुले यात सहभागी झाली होती. परंतु आपल्या विषयापलीकडे काहीतरी करण्याची उमेद त्यांना या स्पर्धेत घेऊन आली होती.