छाया कदम यांचा जाहिर सत्कार व प्रकट मुलाखत; रसिकांसाठी ठरणार पर्वणी
By संजय घावरे | Published: June 7, 2024 05:12 PM2024-06-07T17:12:34+5:302024-06-07T17:14:13+5:30
रंगपीठ थिएटर मुंबईतर्फे छाया यांचा जाहिर सत्कार आणि प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी निःशुल्क आहे.
संजय घावरे, मुंबई : प्रा. वामन केंद्रे यांची विद्यार्थिनी असलेल्या व त्यांच्याच 'झुलवा' नाटकात दार्शी ही व्यक्तिरेखा साकारून नावारूपाला आलेल्या छाया कदम यांच्या 'ऑल वुई इमॅजिन 'अॅजलाईट' या चित्रपटाला फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल रंगपीठ थिएटर मुंबईतर्फे छाया यांचा जाहिर सत्कार आणि प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी निःशुल्क आहे.
मराठी मनाला स्वाभिमान वाटावा असा हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी रंगपीठ थिएटर मुंबई व श्री शिवाजी स्मारक ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ जून रोजी सांयकाळी ७.३० वाजता दादर येथील श्री शिवाजी मंदीर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक व एनएसडीचे माजी संचालक पद्मश्री प्रा. वामन केंद्रे तसेच ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
रंगपीठ थिएटर आयोजित अभिनय कार्यशाळेची विद्यार्थिनी छाया यांनी व्यावसायिक अभिनयाचे धडे प्रा. केंद्रे यांच्याकडेच घेतले. भारतीय रंगभूमीवर मानदंड ठरलेल्या 'झुलवा' या नाटकात तिला महत्वाची भुमिका मिळाली. ही छायाच्या आयुष्यातली पहिलीच भूमिका होती. जवळपास २५० प्रयोगांत छायाने अभिनय केला. या भूमिकेने छायाच्या आयुष्याला कलाटणी दिली व एक गुणी अभिनेत्री म्हणून ती नावारूपास आली. 'झुलवा'पासून सुरू झालेला छायाचा प्रवास 'कान्स फिल्म फेस्टीव्हल'पर्यंत पोहोचला आहे. दरम्यानच्या काळात छायाने 'बाईमाणूस', 'फँड्री', 'सैराट', 'न्युड', 'झुंड', 'गंगुबाई काठीयावाडी', 'लापता लेडीज', 'मडगाव एक्सप्रेस', 'सिस्टर मिडनाईट इन डॅाक्टर्स फोर्टनाईट' असे अत्यंत महत्वाचे चित्रपट केले. अशा गुणी अभिनेत्रीच्या सन्मान सोहळ्याला व तिची जाहीर मुलाखत ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शिवाजी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत व रंगपीठ थिएटरच्या अध्यक्ष गौरी केंद्रे यांनी केले आहे. छाया यांची मुलाखत अक्षय शिंपी व पल्लवी वाघ घेणार असून, मृण्मयी भजक कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.