Join us

कोरोनाच्या बंधनातून मुक्त होताच फुलली राणीची बाग; २ दिवसांत २९ हजार पर्यटकांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:53 PM

बच्चे कंपनीने केली धम्माल 

मुंबई - कोविड काळात लागू सर्व निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्याच रविवारी राणीबागेत पर्यटकांची मोठी गर्दी उसळली. गुरुवारी राणीबागेचे द्वारे खुले झाल्यानंतर दररोज दोन हजार नागरिक या ठिकाणी हजेरी लावत होते. मात्र पहिल्याच वीकेण्डला शनिवार - रविवारी तब्बल २८ हजार ८३४ पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. रविवारी एकाच दिवसांत पर्यटकांची संख्या नेहमीपेक्षा सहापट वाढली, त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागली. 

भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे मुंबईकरांना विशेष आकर्षण आहे. मागील काही वर्षांमध्ये या प्राणिसंग्रहालयाचे नुतनीकरण करुन नवीन प्राणी आणण्यात आले आहेत. बंगालच्या वाघाची रुबाबदार जोडी, त्यांचे नुकतेच जन्मलेले बछडा, पेंग्विनचे पिल्लू असे विशेष आकर्षण ठरत आहे. मात्र मार्च २०२० पासून कोविडचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यानंतर राणीची बाग तीनवेळा बंद करण्यात आली. दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये राणीबाग खुली केल्यानंतर पर्यटकांची गर्दी उसळली होती. यामुळे दुपारी दोन वाजताच प्रवेशद्वारे बंद करण्यास सुरुवात झाली. 

तिसरी लाट महिन्याभरातच ओटक्यात आल्याने राणीबाग आता नव्याने मुंबईकरांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी २८१० पर्यटकांची नोंद झाली. त्यानंतर ही गर्दी रोज वाढत असून शनिवारी नऊ हजार ७५४ तर रविवारी सकाळपासून दिवसभरात तब्बल १९ हजार पर्यटक राणीबागेत आले. गर्दी वाढल्यास कोविडच्या संसर्गाचा धोका असल्याने पर्यटकांमध्ये अंतर असावे, यासाठी प्राणिसंग्रहालयातील सुरक्षा रक्षक सतर्क होते. या एका दिवसात सात लाख सहा हजार ६२५ लाख रुपये उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. 

पर्यटक                    उत्पन्न 

शनिवार - ९७५४ - तीन लाख ७१ हजार १२५ रुपये 

रविवार - १९०८० - सात लाख सहा हजार ६२५ रुपये  

टॅग्स :राणी बगीचामुंबई महानगरपालिका