दरवाढीनंतर राणीबागेतील गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:51 AM2017-08-02T02:51:04+5:302017-08-02T02:51:04+5:30
भायखळ्यातील प्रसिद्ध राणीबाग व पेंग्विन पाहण्याच्या शुल्कात आजपासून वाढ झाली. त्यामुळे आतापर्यंत दोन आणि पाच रुपयांमध्ये मिळणारा प्रवेश थेट ५० व १०० रुपये झाला.
मुंबई : भायखळ्यातील प्रसिद्ध राणीबाग व पेंग्विन पाहण्याच्या शुल्कात आजपासून वाढ झाली. त्यामुळे आतापर्यंत दोन आणि पाच रुपयांमध्ये मिळणारा प्रवेश थेट ५० व १०० रुपये झाला. परिणामी, शुल्कात वाढ झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी राणीबागेतील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले.
पेंग्विनच्या देखभालीचा खर्च जास्त असल्याने राणीबागेच्या शुल्कात वाढ करण्यात आली. तब्बल २३ वर्षांनंतर ही वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही दरवाढ पालिका महासभेत मंजूर झाली.
ती दरवाढ १ आॅगस्ट म्हणजे आजपासून लागू झाली आहे. मात्र पेंग्विनचे राणीबागेत आगमन झाल्यापासून लोटणाºया गर्दीला आज ब्रेक लागला.
पेंग्विन आणल्यापासून दररोज १५ ते २० हजार पर्यटक राणीबागेत येत होते. सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३५ हजारांपर्यंत पोहोचत होता, असा पालिकेचा दावा आहे. मात्र शुल्कात २० पट वाढ झाल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत आज पहिल्या दिवशीच घट झाली. राणीबागेत आज दिवसभरात जेमतेम दोन हजार नागरिक आले
होते, असे राणीबागेतील सूत्रांनी सांगितले.