लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कुठलाही पुरावा नसताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर संसदेच्या व्यासपीठाचा वापर करून आरोप केले. त्यांनी संसदेबाहेर येऊन बोलून दाखवावे. आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू, असे आव्हान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषदेत दिले. लोकसभेत संविधानावरील चर्चेत राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी खोटी विधाने केल्याचा दावा त्यांनी केला.
सावरकर म्हणाले होते, मनुस्मृती हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. मनुस्मृतीकडे धार्मिक ग्रंथ म्हणून पाहावे. त्यामुळे आजच्या काळात आम्ही काय करावे, हे सांगण्याचा अधिकार मनुस्मृतीसह कुठल्याही धर्मग्रंथांना नाही, असे सावरकरांनी स्पष्ट लिहून ठेवले आहे, असेही ते म्हणाले. सावरकरांनी १९४५ साली भारतीय संविधान कसे असावे, यासाठी समिती नेमून 'कॉन्स्टिट्युशन ऑफ द हिंदुस्थान फ्री स्टेट' असे पुस्तक लिहिले होते. सावरकर म्हणतात की, धर्म हा व्यक्तीच्या घरात पाळला जाईल. तसेच बाहेर आल्यावर सर्व धर्मांसाठी समान अधिकार असतील, असेही त्यांनी सांगितले.