मुंबई: सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान रणजितसिंह डिसले यांनी आज कुटुंबियांसमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि रणजीतसिंह डिसले यांची शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली.
रणजीतसिंह डिसले यांनी बक्षिसरुपात मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या ह्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच या भेटीनंतर रणजीतसिंह डिसले यांनी राज ठाकरेंची शिक्षण क्षेत्र संबंधात असणारी प्रचंड आवड खूप चांगली वाटली. तसेच महाराष्ट्र राज्याच नाव शिक्षणक्षेत्रात अधिक उंचावेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असं रणजीतसिंह डिसले यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.
दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले- रणजित डिसले
दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले. हा क्षण म्हणजे आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तसेच शिक्षण विभागाने मोलाचे सहकार्य केल्याची भावना ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी व्यक्त 'लोकमत' शी बोलताना केली.