'जगात भारी' डिसले गुरुजींचा पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मध्ये गौरव होण्याची शक्यता
By मुकेश चव्हाण | Published: December 9, 2020 06:30 PM2020-12-09T18:30:28+5:302020-12-09T18:35:04+5:30
नरेंद्र मोदी यांच्यावतीनं 'मन की बात'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही डिसले गुरुजींचं कौतुक केलं आहे.
मुंबई/ नवी दिल्ली: सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीनं 'मन की बात'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही डिसले गुरुजींचं कौतुक केलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या आगामी मन की बात या कार्यक्रमातही गौरव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकारात्मक ऊर्जा के साथ दिन की शुरूआत! #PositiveMorningspic.twitter.com/XSukIW7DXN
— Mann Ki Baat Updates मन की बात अपडेट्स (@mannkibaat) December 4, 2020
तत्पूर्वी युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.
राज्य सरकारकडूनही सत्कार-
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सत्कार करण्यात आला. यावेळी रणजितसिंह डिसले यांच्या आई श्रीमती पार्वती, वडील महादेव डिसले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री अॅड.वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.
युनेस्को आणि वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक @ranjitdisale यांचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या आई श्रीमती पार्वती, वडील श्री. महादेव डिसले यांचाही सत्कार करण्यात आला. pic.twitter.com/aMSIB16rvg
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 7, 2020
दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले- रणजित डिसले
दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले. हा क्षण म्हणजे आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तसेच शिक्षण विभागाने मोलाचे सहकार्य केल्याची भावना ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी व्यक्त 'लोकमत' शी बोलताना केली.