मुंबई - राज्यातील राजकीय उलथापालथ आणि शिवसेनेत फूट पडून झालेले दोन गट यांच्या पार्श्वभूमीवर अंधेरी विधानसभा मतदार संघात होणारी पोटनिवडणूक ही ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या गटाने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. मात्र ऋतुजा लटके यांनी दिलेला मुंबई महानगरपलिकेतील नोकरीचा दिलेला राजीनामा पालिका प्रशासनाने न स्वीकारल्याने आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिका प्रशासनाने राज्य सरकारने आणलेल्या दबावामुळे स्वीकारलेला नाही, असा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या आरोपाला आता शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटातील नेले गुलाबराव पाटील म्हणाले की, ऋतुजा लटके यांचा राजीनामा नियमाप्रमाणे मंजूर होईल. राजीनामा दिल्यावर मुख्यमंत्री किंवा मंत्री त्यामध्ये लक्ष घालतात, असं कुठे असतं का. त्याची एक प्रक्रिया असते. प्रोसिजरमध्ये राजीनामा दिल्यानंतर मंजूर करण्याचे काही नियम असतील. नियमांप्रमाणे राजीनामा मंजूर होईल. काही नाही झालं की सरकारवर बोट दाखवायचं एवढंच काम राहिलंय दुसरं काही काम राहिलेलं नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, ऋतुजा लटके यांचा राजीनामा नियमानुसारच नामंजूर करण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले आहे. ऋतुजा लटके यांनी ३ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला होता. मात्र राजीनामा मंजूर करण्यासाठी महिनाभराचा अवधी लागतो, असे त्यांनी सांगितले.