भाजपच्या आमदारांना रँकिंग, दुभाषी घेऊन फिरताहेत गावोगावी; सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भोजन

By यदू जोशी | Published: August 27, 2023 01:53 AM2023-08-27T01:53:15+5:302023-08-27T01:53:30+5:30

पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयाने त्यांना दैनंदिन कार्यक्रमही दिला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी लागते. 

Ranking BJP MLAs, moving from village to village with interpreters; Meals at the home of ordinary workers | भाजपच्या आमदारांना रँकिंग, दुभाषी घेऊन फिरताहेत गावोगावी; सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भोजन

भाजपच्या आमदारांना रँकिंग, दुभाषी घेऊन फिरताहेत गावोगावी; सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भोजन

googlenewsNext

- यदु जोशी

मुंबई : भाजपचे देशभरातील ११९ आमदार सध्या तेलंगणामध्ये तळ ठोकून आहेत. त्यात महाराष्ट्रातील २१ आमदारांचा समावेश आहे. हे आमदार गावोगावी फिरतात, लोकांना भेटतात, सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जेवतात. दिवसभर त्यांनी काय काय केले यावर रात्री पक्षाच्या मुख्यालयाकडून त्यांना रँकिंग दिले जाते.

तेलंगणामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. तेथे जबरदस्त यश मिळविण्याच्या इराद्याने उतरलेल्या भाजपने आता महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आसाममधील आमदारांना प्रत्येकी एक याप्रमाणे ११९ मतदारसंघांमध्ये मैदानात उतरविले आहे. या प्रवासी आमदारांचा दिवस सकाळी  ९ पासून सुरू होतो. पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयाने त्यांना दैनंदिन कार्यक्रमही दिला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी लागते. 

भाजपच्या बूथ प्रमुखांची बैठक घेणे, काही प्रमुखांच्या घरी भेट देणे, रॅली काढणे,  व्यावसायिकांशी संवाद, त्यांच्याकडेही भोजन वा नाश्ता घेणे, समाजातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची माहिती, असा भरगच्च कार्यक्रम असतो. अनुसूचित जाती वा जमातीच्या कार्यकर्त्यांच्याच घरी जेवण घ्यायचे, असा दंडक आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कोणते आहेत, ते कसे सोडविता येऊ शकतात, मुख्यमंत्री के.सी. राव यांच्या विरोधातील मुद्दे कोणते आहेत, कुठले मुद्दे हे निवडणुकीत कळीचे ठरू शकतात. ‘फीडबॅक’ही आमदारांना पक्षाकडे द्यावा लागतो.

तेलुगू दुभाष्याचे सहाय्य
शहरी भागामध्ये भाषेची अडचण या आमदारांना फारशी येत नाही; पण ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी तेलुगू भाषा बोलली जाते. तिथे संवादाची अडचण येऊ नये, म्हणून काही आमदारांनी सोबत दुभाषी ठेवला आहे. हे आमदार हिंदीतून बोलतात, मग दुभाषी ते तेलुगूमध्ये समजावून सांगतो. हिंगणघाट; जि. वर्धाचे आमदार समीर कुणावार यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

कामाचे, माहितीचे मूल्यांकन

आमदारांच्या रोजच्या कामगिरीचे मूल्यांकन दरदिवशी केले जाते. त्यासाठी एक ॲप दिलेले आहे. दिवसभर तुम्ही काय काय केले, याची सगळी माहिती त्या ॲपवर टाकावी लागते. तेलंगणा प्रदेश भाजप कार्यालय, महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालय आणि पक्षाच्या दिल्ली मुख्यालयाकडे ही माहिती जाते.

सगळ्या माहितीचे मूल्यांकन करून त्या-त्या दिवशी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या आमदारांना एक ते दहा असे रँकिंग दिले जाते. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ही माहिती दिली.

Web Title: Ranking BJP MLAs, moving from village to village with interpreters; Meals at the home of ordinary workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा