२० कोटी मागितल्याचा आरोप : मरिन ड्राईव्ह पोलिसांकड़ून दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुली टार्गेटच्या आरोपामुळे देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला असला तरी, हे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह या प्रकरणात चांगलेच अडकले आहेत. मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीने आतापर्यंत २५ कोटी रुपये उकळल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सिंह यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील तसेच खासगी इसम सुनील जैन आणि संजय पुनामिया यांच्याविरोधात खंडणी, फसवणूक, धमकाविण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात जैन आणि पुनामिया यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, अग्रवाल आणि पुनामिया यांनी भागीदारीत २००८ मध्ये मे. बालाजी एंटरप्राईज आणि मे. राजा रामदेव इंटरप्रायजेस नावाची कंपनी सुरू केली होती. या दोन कंपन्यांद्वारे दोघांनी २०११ पर्यंत भागीदारीत व्यवसाय केला. मात्र योग्य नफा झाल्याने भागीदारी संपुष्टात आली. मात्र आरोप-प्रत्यारोपातून पुनामिया यांनी अग्रवाल यांच्यावर मुंबई, ठाणेसह इतर जिल्ह्यात १८ गुन्हे दाखल केले. पुढे मोक्का तसेच विविध गुन्ह्यात अडकविण्याच्या नावाखाली परमबीर सिंह आणि त्यांच्या साथीदारांनी २० कोटींची मागणी केली. यापैकी नऊ कोटी धमकावून आणि मारहाण करीत उकळले. पुढे आणखी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याच्या नावाखाली १६ कोटी उकळत जागेवरही कब्जा केला. हे संकट टळत नाही तोच उर्वरित ११ कोटीसाठी तगादा लावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.
परमबीर सिंह यांच्या घरात मारहाण
अग्रवाल यांनी केलेल्या तक्रारीनुसार, ते न्यायालयीन कोठडीत असताना, पुनामियाचे सहकारी सुनील जैनने त्याचा हस्तक मनोज घोटकर याला अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवालकडे पाठवले. पुनामिया परमबीर सिंह यांचे चांगले मित्र असून, तेच त्यांचे आर्थिक व्यवहार पाहतात. गुन्ह्यांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी व नवीन गुन्हे नोंद होण्यापासून थांबविण्यासाठी त्यांना परमबीर सिंह यांच्या भेटीसाठी तयार केले. ठरल्याप्रमाणे सिंह यांच्या कोपरी येथील घरी भेट झाली. यावेळी पोलीस उपायुक्त पराग मनेर तेथे हजर होते. यावेळीही अग्रवाल यांच्याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई न करण्यासाठी २० कोटी रुपयांची मागणी करीत त्यांच्या पुतण्याला मारहाण करण्यात आली. पुढे २० कोटींपैकी ९ कोटी रुपये वसूल केले. तसेच अग्रवाल यांची मालमत्ता जैन आणि पुनामिया यांनी त्यांच्या नावावर करून घेतली. सिंह यांनी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच, पुनामियाने खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची भीती घालून उर्वरित ११ कोटींसाठी दमदाटी सुरू केली. पुनामियाने २०२१ मध्ये अग्रवाल हे अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याच्यावतीने खंडणीसाठी धमकावत असल्याचा आरोप करीत जुहू पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार आणखी एक गुन्हा नोंद करीत, पुन्हा मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या नावाखाली धमकाविण्याचे सत्र सुरू झाले.
गुन्हे शाखेने घर, कार्यालयात धाडी टाकल्या आणि अकबर पठाण, नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी अटक न करण्यासाठी ५० लाखाची मागणी केली. पुढे नातेवाईकांकड़ून पैसे घेत कोरकेमार्फत पोच केले. त्यानंतर गुन्हे शाखेने जप्त केलेले दस्तऐवज त्यांना पुनामियाकड़ून मिळाले. पुढे, पठाण यांनी सिंह आणि पुनामियामध्ये झालेले व्यवहार पूर्ण करण्यासाठी धमकाविले. ड्रग्ज प्रकरणात अडकविण्याची भीती घालून, पुनामिया आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी गोराई येथील मालमत्तेतील ५० टक्के वाटा आणि भाईंदर येथील २० हजार चौरस फूट जागेची मागणी केली. यावेळी मात्र पुनामिया यांच्या पुतण्याने सर्व संभाषणाचे रेकॉर्डिंग करून ठेवले होते. त्यानंतर जबरदस्ती करार करून त्यावर सह्या घेण्यात आल्या. पुढे काही दिवसाने पठाण यांनी त्यांच्या पुतण्याला भेटायला बोलावून आणखी ५० लाख आणि २ बीएचके फ्लॅटची मागणी केली. अटक टाळण्यासाठी पुनामियाला १५ कोटी ५० लाख धनादेशामार्फत दिले. तसेच पठाणसाठी ५० लाख तर श्रीकांत शिंदेला देण्यासाठी २५ लाख रुपये दिले. यातून सुटका होत नाही तोच, २५ एप्रिलपासून पुनामियाने सिंह यांच्यामागे उर्वरित ११ कोटींसाठी तगादा लावला. त्यांचे टॉवर लोकेशन काढून दमदाटी सुरू केली. अखेर पोलिसांच्या जाचाला कंटाळून त्यांनी पोलिसात धाव तक्रार दिल्याचे नमूद केले आहे.
परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ
परमबीर सिंह यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून राज्य शासनाने त्यांच्या खुल्या चौकशीची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिली आहे. त्यानुसार तपास सुरू असताना त्यात मरिन ड्राईव्ह पोलिसांकड़ून सुरू असलेल्या कारवाईमुळे सिंह यांच्या अडचणीत भर पडली आहे.
अकोला पोलीस दलातील पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर यांनी पदाचा गैरवापर करीत हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. तसेच आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या नावे हजारो कोटींची माया गोळा केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांसोबतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. घाडगे यांच्या तक्रारीसोबतच मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनीही परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंह यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांवर आपल्याला खोट्या गुन्ह्यात अटक करून मोक्का लावून ३ कोटी ४५ लाख रुपयाची वसुली केल्याची तक्रार केली आहे. याशिवाय केतन तन्ना यांनीही परमबीर सिंह यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे. सव्वाकोटी रुपयांची वसुली केल्याचा त्यांनी दावा केला आहे. त्यापाठोपाठ आता मरिन ड्राईव्ह पोलिसांकड़ून तपास सुरू करण्यात आला आहे.
----------------------------------------------------------------------------------------