Join us

परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरून वाझेंकडून खंडणी वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:06 AM

कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांचा आरोप; मुख्यमंत्र्यांकडे फेरतपासाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वादग्रस्त ज्येष्ठ आयपीएस अधिकारी ...

कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांचा आरोप; मुख्यमंत्र्यांकडे फेरतपासाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वादग्रस्त ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या ठाण्यातील आयुक्तपदाच्या कारकिर्दीतील भ्रष्ट कारभाराबाबत अनेक तक्रारी दाखल असताना, आता ते मुंबईत आयुक्त असतानाचीही तक्रार समोर आली आहे. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून आपल्याकडून २५ कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा प्रयत्न तत्कालीन एपीआय सचिन वाझेने केला होता, असा आरोप कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहसचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांना त्याबाबतचे निवेदन देऊन आपल्यावरील दाखल गुन्ह्याचा नव्याने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

छाब्रिया यांना गेल्या वर्षी २९ डिसेंबरला गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता विभागाने (सीआययू) कार विक्री व डबल नोंदणी घोटाळा प्रकरणात अटक केली होती. चार महिन्यानंतर त्यांना एप्रिलमध्ये जामीन मिळाला. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या कंपनीत ५२ टक्के शेअर्स असलेल्या किरण कुमार, इंदरमल रामानी व पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरून माझी व माझ्या कुटुंबीयांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला. २०१५ मध्ये मी डीसी अवंती स्पोर्ट्स कार डिझाईन करून बाजारात आणली. किरण कुमार नावाच्या व्यक्तीने स्वत:ची उद्योजक म्हणून ओळख करून देत कंपनीत गुंतवणूक केली. कार डिझाईन प्रकल्पाला कर्जातून बाहेर काढण्याचा माझा प्रयत्न सुरू होता. त्यावर तोडगा म्हणून किरण कुमारने माझी पत्नी कांचन हिच्या नावे पुण्यातील मालमत्तेचा विक्री करार इंदरमल रामानीसोबत करण्यास मला भाग पाडले. अनेक कार बनावट इंजिन आणि चेस नंबर लावून विकल्या.

* १५ गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

परमबीर सिंग यांच्या मदतीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला अटक करायला लावली, असा आराेप छाब्रिया यांनी केला आहे. वाझेने माझ्याकडून २५ कोटींच्या खंडणी वसुलीसाठी माझ्या कुटुंबातील सदस्यांचा खूप छळ केला. २५ कोटी दिले नाही तर आणखी १५ गुन्ह्यात अडकवितो, अशी धमकी ताे देत होता. सीआययूअंतर्गत तपास असलेल्या सर्व प्रकरणांची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

-------------------------------------------------