मुंबई : तिहार तुरुंगात असलेल्या छोटा राजनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे नाव आणि फोटो असलेेले पावती पुस्तक छापून एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. व्यापाऱ्याने कुरार पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्यांनी ६ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित आरोपींनी छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करत कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. पावती पुस्तकातही ‘सीआर’ असा कोडवर्ड छापण्यात आला असून, छोटा राजनचा फोटो वापरला आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या गुंडांनीच बेकायदा पावती पुस्तक छापले होते. तसेच त्याद्वारे धमकावून खंडणी वसूल करण्याचे सत्र सुरू केले होते, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. पोलिसांना आरोपींकडे अशी अनेक पावती पुस्तके मिळाली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गाढवे यांनी दिली आहे.
वाढदिवस साजरा करण्यात चुकीचे काय ?विशेष म्हणजे छोटा राजनच्या गुंडांच्या बचावासाठी त्याचा भाऊ दीपक निकाळजे पुढे आला आहे. छोटा राजनचा वाढदिवस साजरा करण्यात काहीच चुकीचे नाही, असे त्याने म्हटले आहे. जर कोणाला, कोणी आवडत असेल आणि त्याचा वाढदिवस साजरा करत असेल तर त्याबाबत कुणालाच कुठल्याच प्रकारचा आक्षेप असण्याचे कारण नाही, असेही निकाळजे याने म्हटले आहे.
कबड्डी स्पर्धा केवळ नावापुरतीच कबड्डी स्पर्धा केवळ नावापुरतीच होती. प्रत्यक्षात राजनच्या नावाने खंडणी वसुलीचा व्यवसायच सुरू असल्याचे यातून समोर आले आहे. याप्रकरणी बेकायदा स्वयंसेवी संस्थाही सुरू करण्यात आल्या होत्या. त्यांचे नाव पुढे करून खंडणी वसुलीचे सत्र सुरू होते.
चार दिवसांपूर्वी कुरार पोलिसांना मिळाली टीपछोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्त बॅनर लागल्याची माहिती पोलिसांना चार दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व बॅनर जप्त केले. तसेच एका गुन्हेगाराचे फोटो सार्वजनिक ठिकाणी झळकविल्याबद्दल कुरार पोलिसांनी सागर गोळे , ज्ञानेश्वर सदाशिव गोळे, गौरव चव्हाण, दिपक दत्तू सकपाळ आणि विद्या कदम यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.