पश्चिम बंगालच्या कोलकाता रेल्वे जंक्शन मार्गावरील रानाघाट रेल्वे स्थानकावर गाणे गात उदरनिर्वाह करणा-या रानू मंडालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिच्या नशिबाने कलाटणी घेतली. रानू मंडल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांची मुलगी तब्बल 10 वर्षानंतर त्यांचा शोध घेत आली असल्याचे समोर आले होते. यामुळे मुलगी एलिजाबेथ साथी रॉय हीच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती. यावर एलिजाबेथने या टीकाकारांना प्रत्यूत्तर दिले आहे.
रानू मंडल त्यांच्या मुलीपासून तब्बल 10 वर्ष दूर राहिल्या होत्या. पण त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होताच त्यांची मुलगी त्यांच्याकडे धावत आली आहे. त्यांची मुलगी परत आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला असून माझ्या दुसऱ्या आयुष्याला सुरुवात झाल्याचे रानूने सांगितले होते. अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून तिच्यावर खूप टीका झाली होती.
एलिझाबेथने सांगितले की, आईला मी रोज भेटत नव्हते, पण संपर्कात असायचे. मात्र, ती रेल्वे स्टेशनवर अशाप्रकारे गाणी गात उदरनिर्वाह करत असेल याची कल्पना नव्हती. मी मला जेवढी शक्य होती तेवढी मदत करत होती. कारण माझ्याही काही समस्या आहेत, असे तिने सुनावले आहे.
रानू मंडलला चार मुले आहेत. एलिजाबेथने सांगितले की, मी एका मुलाची आई आहे. छोटेसे दुकान चालवत असून त्यावरच संसार चालविते. आईला मी सोबत राहण्यास सांगितले होते, मात्र तिने नकार दिला होता. काही महिन्यांपूर्वी मी आईला कोलकाताच्या धरमताला बस स्टँडवर कारणाशिवाय बसलेले पाहिले. तिला 200 रुपये देत घरी जाण्यास सांगितले होते. जेव्हा शक्य असायचे तेव्हा मी काकांच्या खात्यामध्ये 500 रुपये भरत होते. माझा घटस्फोट झाला आहे आणि दुकानातच राहते. मला एक छोटा मुलगाही आहे. यामुळे माझ्या समस्या वेगळ्या आहेत. हे न जाणताच लोक माझ्यावर आरोप लावत आहेत. मला दोष देत आहेत, आता मी कोणाकडे जाऊ? असा सवालही रानूच्या मुलीने केला आहे.