"त्यांना मला मारायचे आहे, आईच्या क्लिनिकमध्ये पेशंट बनून..."; रणवीर अलाहाबादियाच्या पोस्टने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 22:09 IST2025-02-15T22:07:46+5:302025-02-15T22:09:56+5:30
रणवीर अलाहाबादियाने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे.

"त्यांना मला मारायचे आहे, आईच्या क्लिनिकमध्ये पेशंट बनून..."; रणवीर अलाहाबादियाच्या पोस्टने खळबळ
Ranveer Allahbadia: कॉमेडियन समय रैनाच्या स्टँड-अप कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया अडचणीत सापडला आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, समय रैना यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादियाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. सामान्यांसह राजकारणी, सेलिब्रिटी आणि हिंदू संघटनांनीही रणवीरवर टीका केली. भारतातील विविध राज्यांमध्ये त्याच्या नावावर गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. या सगळ्यावर आता रणवीरने एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
इंडियाज गॉट लेटेंटमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर रणवीर अलाहाबादियासह इतर कलाकारांना पोलिसांनी समन्स बजावले होते. मात्र रणवीर अद्याप पोलिसांसमोर हजर झालेला नाही. अशातच रणवीरने त्याच्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मी आणि माझी टीम पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे रणवीर अलाहाबादियान सांगितले आहे. तसेच, आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचेही त्याने सांगितले. यासह त्याच्या आईवर ज्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत तिथे काही लोक पेशेंट म्हणून आल्याचेही रणवीरने सांगितले.
"मी आणि माझी टीम पोलिसांना सहकार्य करत आहोत. मी त्यांच्या प्रक्रियेचे पालन करेन आणि यंत्रणांसमोर हजर राहीन. पालकांबद्दलच्या माझे विधान अतिशय असंवेदनशील आणि अनादर करणारं होतं. त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. मला दिसतंय की काही लोक मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यांना मला मारायचे आहे. लोक माझ्या आईच्या दवाखान्यात रुग्ण म्हणून येत आहेत. मी खूप घाबरलो आहे आणि मला काय करावे हे समजत नाही. मी पळून गेलेलो नाही. माझा भारतातील पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे," असं रवणीरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
— Ranveer Allahbadia (@BeerBicepsGuy) February 15, 2025
रणवीरसोबतच कॉमेडियन समय रैना, यूट्यूबर आशिष चंचलानी आणि अपूर्वा मखिजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्येकाला एक एक करून मुंबईतील खार पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली जात आहे. रणवीर अलाहाबादियाने अद्याप त्याचा जबाब नोंदवलेला नाही. त्याच्याशी संपर्क होत नाहीये. त्याच्या मुंबईतील घराला कुलूप आहे. त्याचा फोन बंद होत आहे. त्याच्या वकिलासोबतही बोलणं झालेलं नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.