मुंबई : एआयबी नॉकआउट या कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह व अर्जुन कपूर यांनी बीभत्स जोक केल्याने, तसेच अपमानास्पद भाषा वापरल्याने या दोघांविरोधात मुंबई व पुणे येथे गुन्हे नोंदविण्यात आले. या गुन्ह्यांवरून पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये, यासाठी या दोघांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. मात्र, न्यायालयाने या दोघांनाही अंतरिम दिलासा देण्यास मंगळवारी नकार दिला आहे.दोघांनीही मूळ तक्रारदाराला व सरकारी वकिलांना याचिकेची प्रत न दिल्याने न्या. आर.एम. सावंत व न्या. सारंग कोतवाल यांनी त्यांना तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला. मूळ तक्रारदाराला व सरकारी वकिलांना याचिकेची प्रत द्या. मगच तुम्ही केलेल्या विनंतीचा विचार करू, असे न्यायालयाने म्हटले.२० डिसेंबर २०१४ रोजी वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया येथे एआयबी नॉकआऊट हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात रणवीर व अर्जुनसह आणखी १० सेलीब्रिटी उपस्थित होते. करण जोहर, दीपिका पदुकोण, आलिया भट यांचाही समावेश होता.हा कार्यक्रम व सेलीब्रिटींविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये गिरगाव दंडाधिकाºयांकडे तक्रार केली. या तक्रारीवर दंडाधिकाºयांनी या सर्वांवर गुन्हे नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना दिले. या निर्देशानंतर पुण्यातील एका नागरिकाने या सर्वांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविला. त्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी रणवीर, अर्जुनला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याकरिता काही दिवसांपूर्वी समन्स बजावले. त्यामुळे या दोघांनीही गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
रणवीर, अर्जुनला दिलासा नाहीच!, एआयबी नॉकआउट कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 6:27 AM