ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27- संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, सिनेमाती भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रत्येक कलाकार विशेष मेहनत घेतो आहे. सध्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. पद्मावती सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता रणवीर सिंगला दुखापत झाल्याची माहिती मिळते आहे. सिनेमातील क्लायमॅक्सचं शूटिंग सुरू असताना रणवीरला दुखापत झाली आहे. सेटवरील सूत्रांच्या माहितीनूसार रणवीरला दुखापत झाली होती पण सेटवरच त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा शूटिंग सुरू केलं आहे. गुरूवारी शूटिंग सुरू असताना हा अपघात झाला आहे.
सिनेमातील क्लायमॅक्सचं शूटिंग सुरू असताना रणवीरच्या डोक्याला जखम झाली पण तो सीनमध्ये व्यस्त असल्याने जखम झाल्याची जाणीव त्याला झाली नाही. डोक्यातून रक्त यालला लागल्यावर जखम झाल्याचं रणवीरला समजलं. त्यावेळी सेटवरच रणवीरला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असल्याची माहिती मिळते आहे.
हॉस्पिटलमधून उपचार घेऊन रणवीर पुन्हा सेटवर परतला आणि त्याने क्लायमॅक्सचं शूटिंग पूर्ण केलं आहे. राणी पद्मावतीवर आधारीत या सिनेमाता अभिनेता रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजी ही व्यक्तीरेखा साकारतो आहे. तर अभिनेत्री दीपिका पादूकोण पद्मावतीची भूमिका साकारते आहे.
एकंदरीतच पद्मावती सिनेमा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या समोरील अडचणी काही केल्या संपत नाही आहेत. सिनेमाच्या शूटिंगच्या सुरूवातीपासून दिग्दर्शकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे.याआधी जयपूर आणि कोल्हापूरमध्ये सिनेमाला विरोधा दर्शविण्यासाठी काही जणांकडून सेटची जाळपोळ करण्यात आली होती.