भाजपाच्या मराठी दांडियात रणवीर सिंहनं दिली 'हर हर महादेव, जय शिवाजी' घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 08:26 AM2022-10-03T08:26:30+5:302022-10-03T09:06:50+5:30
काळाचौकीच्या शहीद भगतसिंग मैदानात यंदा भाजपाने मराठी दांडिया महोत्सवाचं आयोजन केलं आहे.
मुंबई - नवरात्र उत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीने मुंबईत मराठी दांडिया महोत्सवाचं आयोजन केलं आहे. रविवारी या महोत्सवाला बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह याने हजेरी लावली. रणवीरने दिलेल्या हर हर महादेव, जय शिवाजी या घोषणांनी मैदान दणाणून सोडलं. भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी रणवीर सिंहचं स्वागत केले.
काळाचौकीच्या शहीद भगतसिंग मैदानात यंदा भाजपाने मराठी दांडिया महोत्सवाचं आयोजन केलं आहे. रणवीरच्या एन्ट्रीवेळी जय श्रीरामचं गाणं लावण्यात आलं होतं यावर तरुणाई थिरकली, रणवीरची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. रणवीरच्या फुल ऑन एनर्जीनं मैदानात वेगळाच उत्साह भरला. यावेळी रणवीरने पानिपत सिनेमातील मल्हारी गाण्यावर डान्स केला त्याचसोबत गल्ली बॉय सिनेमातील अपना टाईम आयेगा हे रॅप सॉंग गात तरुणाईला भुरळ घातली. या कार्यक्रमात रणवीरच्या हस्ते रोहिणी पवार, महेश आंग्रे या विजेत्यांना आयफोन ११ देण्यात आला.
भाजपाच्या मराठी दांडिया महोत्सवात बॉलीवूड अभिनेता @RanveerOfficial याने हजेरी लावली #Navratrapic.twitter.com/wpdHrMMQVH
— Lokmat (@lokmat) October 3, 2022
यावेळी आमदार मिहीर कोटेचा म्हणाले की, अपना टाईम आयेगा नाही तर अपना टाईम आ गया. राज्यात सत्ता परिवर्तन झालं आहे. देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आता प्रत्येक हिंदू सण साजरा होणार म्हणजे होणार असं त्यांनी सांगितलं.
मराठी दांडियावरून शिवसेना-भाजपात राजकीय युद्ध
मुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे. शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही अशा शब्दात शिवसेनेने भाजपाच्या कार्यक्रमावर टीकास्त्र सोडलं.
तर ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली. अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले. ज्यांनी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सावाची धूम सुरू आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय. मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय त्यांना आमचा एकच सल्ला मग घ्या ना धौती योग असा मार्मिक टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावत मराठी दांडियावरील टीकेला प्रत्युत्तर दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"