एल्गार परिषद : राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या वरावरा राव यांना नानावटी रुग्णालयातून जे.जे. या सरकारी रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमध्ये ठेवण्याची सरकारची तयारी आहे, अशी माहिती गुरुवारी सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली.
राव यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून हलवले जाऊ शकते, असा अहवाल नानावटी रुग्णालयाने काही दिवसांपूर्वी न्यायालयात सादर केला.
नानावटी रुग्णालयातून त्यांना हलविण्यात आल्यानंतर राव यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात येईल, अशी भीती राव यांच्या वकिलांनी व्यक्त केली.
सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले की, राव यांना खासगी रुग्णालयातून जे.जे. रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे.
त्यांच्यावर नानावटीत करण्यात येणारे उपचार सुरूच ठेवू. तसेच नियमानुसार, त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगीही देण्यात येईल, अशी माहिती ठाकरे यांनी न्यायालयाला दिली.
राज्य सरकारने त्यांच्या वयाचा विचार करून व मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले.
दरम्यान, आयुष्याचे अखेरचे दिवस सन्मानाने जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यामुळे राव यांची सशर्त जामिनावर सुटका करावी, अशी विनंती राव यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाला केली. तर, याबाबत एनआयएलाही आपले म्हणणे मांडायचे असेल, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २७ जानेवारी रोजी ठेवली.
................................