मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण जंक्शन या दरम्यानच्या प्लॅटफार्मवर सुमारे १५० बूट पॉलिश कर्मचारी गेल्या ५० वर्षापासून कार्यरत आहेत. दरमहा या कर्मचाऱ्यांना रूपये ५०० इतके भाडे रेल्वे खात्याकडे भरावे लागते, यामध्ये दरवर्षी सहा टक्के वाढ करण्यात येते. सन २००६ पूर्वीचे जे बूट पॉलिश कर्मचारी आहेत, त्यांचे परवाने नुतनीकरण करण्यात यावे असे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले असून नव्याने निविदा मागविल्या आहेत.
या निविदेतील रक्कम भरणे या गरीब बूट पॉलिश कर्मचा-यांना शक्य नाही म्हणून ही निविदा रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी खासदार गोपाळ शेट्टी व खासदार मनोज कोटक यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व बूट पॉलिश कामगारांची बाजू मांडली. या विषयाबाबत बूट पॉलिश कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राम किशन महेरा, शिवपूजन नडवाल व उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष गणेश खणकर सातत्याने पाठपुरावा केला होता.
यावेळी माननीय मंत्री महोदयांनी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना तात्काळ सदर निविदा रद्द करणेबाबतच्या सूचना दिल्या आहेत. बूट पॉलिश कर्मचारी संघटनेने आपल्या समस्या मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केल्या बद्दल खासदार गोपाळ शेट्टी व खासदार मनोज कोटक तसेच गणेश खणकर यांचे आभार मानले आहेत.