मुंबई: आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी लोकल रेल्वेचा प्रवास आणि स्थानकाची पाहणी केली. या पाहणीनंतर रावसाहेब दानवेंचे नेहमीप्रमाणे एक वेगळे रुप पाहायला मिळाले. रावसाहेब दानवे यांनी आश्विनी वैष्णव यांच्यासोबत रेल्वे स्थानकाबाहेर वडापाव आणि भज्याचा आनंद घेतला.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यात एका हॉटेलमध्ये वडा पाव, भजी पाववर ताव मारला. नाश्ता करताना हे सगळे अगदी तुटून पडलेले पाहायला मिळाले. ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याच्या हॉटेलमध्ये या सगळ्यांनी वडापाववर ताव मारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मध्य रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या उदघाटन केले. त्यासाठी ठाणे स्थानकात सकाळपासून अनेक मंत्री हजर होते. दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि इतर भाजपन नेत्यांसह ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला. यादरम्यान, अश्विनी वैष्णव यांनी आज लोकल प्रवास करून प्रवाश्यांशी चर्चा देखील केली. त्यांच्या अडचणी जाऊन घेतल्या आणि लवकरात लवकर अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.