रावसाहेब दानवे केंद्रात; नव्या प्रदेशाध्यक्षांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:09 AM2019-05-29T05:09:34+5:302019-05-29T05:09:45+5:30

दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता असून त्यांच्या जागी लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Raosaheb Danwei Center; The search for the new State President | रावसाहेब दानवे केंद्रात; नव्या प्रदेशाध्यक्षांचा शोध

रावसाहेब दानवे केंद्रात; नव्या प्रदेशाध्यक्षांचा शोध

Next

यदु जोशी

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता असून त्यांच्या जागी लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दानवे यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दानवे यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना ग्राहक कल्याण आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाचे राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. २०१५ पर्यंत ते मोदी मंत्रिमंडळाचे सदस्य होते पण त्यानंतर त्यांना महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून पाठविण्यात आले. तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याने दानवे यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
दानवे हे यावेळी सलग पाचव्यांदा जालना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. तत्पूर्वी ते भोकरदनचे दोनवेळा आमदार होते. सरपंच पदापासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ग्राम पंचायतींपासून लोकसभेपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने मोठे यश संपादन केले. त्याला दानवे यांनी पक्षसंघटनेची उत्तम साथ दिली. त्याचेच बक्षीस म्हणून दानवे यांना केंद्रात पाठविले जात असल्याचे म्हटले जाते.
चार महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दानवे यांनी त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना बळ दिले असा आरोप शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी जाहीरपणे केला होता. या पार्श्वभूमीवर, दानवे प्रदेशाध्यक्ष राहिले तर भाजप-शिवसेनेच्या संबंधांमध्ये अडचणी येऊ शकतात हेही दानवे यांना केंद्रात पाठविण्यामागचे एक कारण असल्याचेही म्हटले जाते.
दानवेंनंतर प्रदेशाध्यक्ष निवडताना मराठा समाजाचाच निकष लावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, अकोल्याचे असलेले गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. बिगरमराठा चेहरा दिल्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. निलंगेकर यांच्या नावाला मराठवाड्यातच भाजप अंतर्गत विरोध होऊ शकतो.
मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील व्यक्तीला संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. केवळ राजकीय गणिताचा विचार करुन एखाद्या समाजाच्या नेत्याला एखादी संधी देण्यावर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा विश्वास नाही. जातीच्या आधारे मांडली जाणारी असली समीकरणे तोडण्यावरच त्यांचा भर राहिला आहे. तथापि, विधानसभा निवडणूक होत असताना अशी जोखीम पत्करली जाईल का, हा प्रश्न आहे.
>दानवे केंद्रात गेले तर त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष कोण याचे उत्तर शोधले जात आहे. ब्राह्मण मुख्यमंत्री असताना प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजाला द्यायला हवे या विचारातूनच दानवेंना संधी देण्यात आली होती.

Web Title: Raosaheb Danwei Center; The search for the new State President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.