Join us

बलात्कार व हत्या प्रकरण मीडियापासून लपवतो, आम्हाला पैसे द्या !

By गौरी टेंबकर | Published: July 05, 2024 2:30 PM

त्या' सीबीआय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

गौरी टेंबकर

मुंबई: तुमच्या मुलासह अन्य चार मित्रावर एका तरुणीचा बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आम्ही त्याला अटक केलीय मात्र त्यात तुमचा मुलगा निर्दोष असून सदर प्रकरण मीडियामध्ये न देण्यासाठी लाखो रुपये सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत उकळण्यात आले. या विरोधात गृहिणीने दहिसर पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शशिकला लढढा (५९) या दहिसर पूर्वच्या आंबावाडी परिसरात पती आणि मुलगा रमाकांत (३८) याच्यासोबत राहतात. शशिकला यांच्या तक्रारीनुसार, २ मे रोजी त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. कॉलरने तो वांद्रे येथील सीबीआय ऑफिसमधून बोलत असून आम्ही तुमच्या मुलाला अटक केली आहे असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने अटकेचे कारण विचारले. तेव्हा त्या इसमाने त्यांना सांगितले की चार-पाच महिन्यांपूर्वी तुमचा मुलगा फिरायला बाहेर गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या इतर ४ मित्रांनी मिळून एका मुलीवर बलात्कार करत तिचा खून केला. तसेच यामध्ये तुमच्या मुलाने काहीही केलेले नसून तो त्याच्या मित्रांना वाचवण्यासाठी याठिकाणी आला आहे.

आम्ही अजून हे प्रकरण मीडियामध्ये दिलेले नाही तसेच अन्य कोणाला सांगितलेलेही नाही.त्यामुळे जर तुम्हालाही हे थांबवायचे असेल तर मला पैसे द्यावे लागतील. मात्र माझ्याकडे पैसे नाहीत असे उत्तर तक्रारदाराने दिल्यावर तुमच्याकडे जी रक्कम आहे ती मला पाठवा असे कॉलर त्यांना म्हणाला. इतकेच नव्हे तर त्याने त्यांच्या मुलाचा रडण्याचा आवाज त्यांना ऐकवला त्यामुळे त्या घाबरल्या. त्यांनी कॉलरने सांगितल्याप्रमाणे थोडे थोडे करत १.२५ लाख रुपये दिलेल्या बँक खात्यात पाठवले.

मात्र अजून पैशाची मागणी होऊ लागल्याने त्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला. तेव्हा त्यांचा मुलगा ऑफिसमध्ये सुखरूप असल्याचे त्यांना समजले आणि सीबीआयच्या नावाखाली त्यांची फसवणूक झाल्याचेही उघड झाले. त्यानुसार याप्रकरणी त्यांनी दहिसर पोलिसात धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ४१९,४२० व माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.