लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न
By admin | Published: August 9, 2015 03:00 AM2015-08-09T03:00:25+5:302015-08-09T03:00:25+5:30
लोकलमधून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीवर एका तरुणाने बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चर्चगेटकडे जाणाऱ्या मरिन लाइन्स स्थानकाजवळ
मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीवर एका तरुणाने बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चर्चगेटकडे जाणाऱ्या मरिन लाइन्स स्थानकाजवळ महिलाच्या डब्यात शिरून या वासनांधाने हा प्रकार केला असून, या घटनेला अडीच दिवस उलटूनही पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे महानगरात महिलांसाठी रेल्वे सुरक्षित असल्याचा दावा किती फोल आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
संशयित तरुणाचे चित्रण रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये झालेले आहे. त्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबविली असली तरी शनिवारी रात्रीपर्यंत त्यांना त्याचा थांगपत्ता लावता आलेला नाही. संबंधित २२ वर्षांची तरुणी एमबीए करीत असून, मालाडमधील माधव नगरात पेइंग गेस्ट म्हणून राहते. चर्चगेटजवळ राहत असलेल्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गुरुवारी रात्री मालाड स्टेशन येथून लोकलमध्ये मोटरमनच्या बाजूला असलेल्या महिलांच्या डब्यात बसली. त्यावेळी डब्यात सुरक्षेसाठी पोलीस नव्हता. लोकल महालक्ष्मी स्थानक येईपर्यंत डब्यात ती एकटीच उरली होती. आरोपी तरुणाने ही बाब हेरून ११ वाजून ८ मिनिटांनी ग्रॅण्ट रोड स्टेशन सुटल्यानंतर महिलांच्या डब्यात तो शिरला. तिच्याशी लगट करीत छेडछाड करू लागला. आकस्मिकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे ती बिथरून गेली आणि घाबरून ओरडू लागली. त्यामुळे अन्य डब्यांत बसलेल्या काही प्रवाशांच्या लक्षात हा प्रकार आला. मात्र मरिन लाइन्स स्टेशनला पोहोचण्यापूर्वी तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी मारून पलायन केले. स्थानकावर गाडी थांबल्यानंतर दोघा प्रवाशांनी महिलांच्या डब्याकडे धाव घेतली. तिला धीर देत स्टेशन मास्टरकडे घेऊन गेले. त्यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर चर्चगेट रेल्वे स्थानकातील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीचे चित्रण स्टेशनवर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून मिळाले असून, त्यावरून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही लोकल नियमित स्वरूपाची नव्हती़ रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडल्याने ही विशेष गाडी सोडण्यात आली होती. त्यामुळे त्यामध्ये सुरक्षेसाठी पोलीस नेमण्यात आलेला नसावा, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद विजय झा यांनी सांगितले.
सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट चित्रण
हा नराधम २० ते २२ वर्षांचा असून, उंच व शिडशिडीत आहे. त्याने निळ्या रंगाची डिझाइन असलेला टीशर्ट व तांबड्या रंगाची पॅँट घातली होती.