मुंबई : नरिमन पॉईंट येथील मनोरा आमदार निवासात झालेल्या बलात्कार प्रकरणाला सध्या राजकीय रंग येताना दिसत आहे. पोलिसांनी महेश्वर कदम नावाच्या इसमाला अटक केली असली तरी युनायटेड काँग्रेसच्या वतीने नांदेडच्या नायगावचे आमदार वसंतराव चव्हाण यांना देखील आरोपी करण्याची मागणी केली आहे. मात्र आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे. आमदार निवासात ज्या ९३ क (उ) या खोलीत हा प्रकार घडला ती खोली वसंतराव चव्हाण यांना देण्यात आली होती. याच घरात सहा वेळा महेश्वर कदम नावाच्या इसमाने लग्नाचे अमिष दाखवून १८ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केला. सप्टेंबर २०१५ ला जेव्हा पहिल्यांना महेश्वरने या मुलीला आमदार निवासात नेले तेव्हा तेथील सुरक्षारक्षकांनी मुलीचे वय बघून तिला आत सोडण्यात मज्जाव केला होता. मात्र तेव्हा आमदार वसंतराव चव्हाणांच्या मध्यस्थीनंतर महेश्वर, तक्रारदार मुलगी आणि आणखी दोघांना आत सोडण्यात आले. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात आमदारही दोषी असल्याचा आरोप युनायटेड काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केला आहे.तक्रारदार तरुणी आणि आरोपी या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत एकूण सहा वेळा अतिप्रसंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. १३ सप्टेंबरला मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी याप्रकरणात मुलीचा सविस्तर जबाब नोंदविण्यात आला आहे. याबाबत आमदार चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, मी सध्या आकाशवाणी येथील आमदार निवासात राहत आहे. तर मनोरा निवास हा ग्रामीण भागातून येणारे नातेवाईक, नेते मंडळी यांच्या सोयीसाठी ठेवला आहे. त्यात कदमही माझ्याकडे येत होता. त्याने नेहमीप्रमाणे माझ्याकडून गेस्ट पास घेतले. मात्र त्यावेळेस त्याच्यासोबत मुलगी आहे. याची माहिती मला नव्हती. याबाबत मी विधानसभेच्या अध्यक्षांकडेही लेखी खुलासा केला आहे. कुठेतरी या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न पक्ष नेते करत असल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
बलात्कार प्रकरणात आमदारही आरोपी?
By admin | Published: October 15, 2016 7:06 AM