मानखुर्द : नोकरीचे आमिष दाखवत मानखुर्द येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मानखुर्द पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. मानखुर्दच्या इंदिरानगर परिसरात ही तरुणी तिच्या कुटुंबीयांसोबत राहत असून, याच परिसरातील एका खासगी रुग्णालयात ती नर्सचे काम करते. आॅक्टोबर २०१३ मध्ये याच परिसरात राहणाऱ्या अजिज शहा (२७) या तरुणासोबत तिची ओळख झाली होती. आरोपीने या तरुणीला विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिच्यासोबत मैत्री केली. यासाठी त्याने तरुणाला तत्काळ पासपोर्ट बनवायचा असल्याचे सांगून तिच्याकडून १० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी पासपोर्टच्या कामासाठी वाशीला जायचे असल्याचे सांगत तिला एका लॉजवर नेले. या ठिकाणी या तरुणीला थंड पेयातून गुंगीचे औषध देऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने तिचे मोबाइलमध्ये अश्लील फोटो देखील काढून ठेवले होते.जाग आल्यानंतर तरुणीला हा प्रकार लक्षात येताच तिने त्याला जाब विचारला. मात्र आरोपीने मोबाइलमधील फोटो दाखवत ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर अनेकदा या आरोपीने तरुणीला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. अखेर तरुणीने ३ जानेवारीला मानखुर्द पोलीस ठाण्यात याबाबत लेखी अर्ज केला. त्यावरून पोलिसांनी रविवारी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला़मात्र त्याला ही बाब समजताच तो पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
मानखुर्द येथे तरुणीवर बलात्कार
By admin | Published: January 19, 2015 12:40 AM