राज्यात दर दोन तासांत होतोय एक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 06:02 AM2020-02-10T06:02:30+5:302020-02-10T06:02:50+5:30
रोज ३४ जणींचा विनयभंग : गत वर्षात अत्याचाराचे २० हजारांवर गुन्हे
जमीर काझी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वच नागरिकांसाठी सुरक्षित व प्रगतशील राज्य समजल्या जाणाऱ्या महाराष्टÑाची ओळख आता महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे पुसली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यात प्रत्येक दोन तासांमध्ये एकीवर बलात्कार होत आहे, तर रोज ३४ अबलांचा विनयभंग केला जात असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. त्याचप्रमाणे छेडाछेडी व हुंडाबळीच्या गुन्ह्याचा आलेखही वाढत राहिला आहे.
राज्यात तरुणी, महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे आकडेवारीवर स्पष्ट आहे. २०१९ मध्ये महिला अत्याचाराच्या तब्बल २० हजार २४९ घटना पोलिसांच्या दप्तरी दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १३ हजार ६७१ विनयभंगाच्या, तर त्याखालोखाल बलात्काराचे ५ हजार ४१२ गुन्हे घडले आहेत. राज्यात विविध ठिकाणी छेडाछेड व हुंडाबळीच्या अनुक्रमे ६ हजार ४७५ व १,४३० घटना घडल्या आहेत. २०१७ व २०१८ मध्ये बलात्काराच्या अनुक्रमे ४,३५६ व ४,९७३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर या वर्षात विनयभंगाचे अनुक्रमे १२ हजार २३८ आणि १४ हजार ६६ गुन्हे दाखल आहेत.
एक जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी ‘लोकमत’च्या हाती आहे. त्यानुसार महाराष्टÑात दररोज बारा म्हणजे दोन तासांमागे एक बलात्काराचा गुन्हा दाखल होत आहे. तर रोज ३४ जणींचा विनयभंग होत असल्याचे दाखल तक्रारींतून समोर आले आहे. अर्थात, ही आकडेवारी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची असून अनेक घटनांची नोंदच होत नाही. पीडित तरुणी, महिलांवर विविध कारणांनी दबाव टाकून तक्रार देण्यापासून वंचित ठेवले जाते.