लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बलात्कार हा घृणास्पद गुन्हा आहे. त्यामुळे शिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची दया दाखवू शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने एका आरोपीची शिक्षा तीन वर्षांहून सात वर्षे केली.
बलात्कार पीडितेला आयुष्यभर अपमान सहन करावा लागतो. अपराधीपणाची भावना तिची पाठ सोडत नाही, असे न्या. साधना जाधव व न्या. एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाने म्हटले.
पीडितेचा जबाब विश्वासार्ह आहे, असे वाटले की आरोपीला दोषी ठरवले पाहिजे आणि गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार शिक्षा ठोठावली पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे की, समाज हा उपहास, अपमान, अवहेलना आणि इच्छेच्या उद्देशाने एखाद्या स्त्रीकडे पाहू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
बलात्कार हा स्त्रीच्या सर्वोच्च सन्मानास धक्का पोहोचवतो. तिला आयुष्यभर अपमानाने जगण्यास भाग पाडले जाते, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुंबई सत्र न्यायालयाने हॉटेल मालकाच्या मुलाला शिक्षा ठोठावताना दाखवलेली दया नामंजूर केली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला सत्र न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेत वाढ करून सात वर्षे केली.
--------------------------