अंबरनाथ : अंबरनाथमधील एका राजकीय पक्षातील पदाधिकारी महिलेला लग्नाचे आमिष दाखवत एका पोलिसानेबलात्कार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. अखेर, पीडित महिलेने गृहमंत्र्यांकडे दाद मागितली होती. गृहमंत्र्यांनी या पीडित महिलेची भेट घेत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.
अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या मिलिंद हिंदुराव या पोलिसाने एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिलेसोबत मैत्री करत प्रेमाचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंधही जुळले. एवढेच नव्हे तर हिंदुराव याने अंबरनाथच्या एका लहानशा मंदिरात त्या पीडित महिलेसोबत लग्नही केले.
मात्र, त्या लग्नाला तिने विरोध करत सर्व विधिवत लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तात्पुरत्या स्वरूपात हे लग्न करू. नंतर सर्वांच्या उपस्थितीत लग्न करू, असे सांगितले. पीडितेने लग्नाचा हट्ट करताच त्याने तिला जातीवरून हिणवत लग्नास नकार दिला. जातीवरून गैरशब्द वापरल्याने त्यांच्यात वादही झाला. त्याच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन त्यांना धमकाविले. या प्रकरणी पीडित महिला पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यावर तिची तक्रारही घेतली नाही.
आरोपीला अटक नाही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याने पीडित महिलेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागितली. देशमुख यांनी पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शिवाजीनगर पोलिसांनी तक्रार दाखल करून हिंदुराव याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्याला अद्याप अटक झालेली नाही.