Join us

वकिलांचा मोलकरणीवर बलात्कार

By admin | Published: December 29, 2016 3:53 AM

ओटी सेक्शन परिसरात राहणाऱ्या मोलकरणीवर गेल्या नऊ महिन्यांपासून बलात्कार केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी चारजण

उल्हासनगर : ओटी सेक्शन परिसरात राहणाऱ्या मोलकरणीवर गेल्या नऊ महिन्यांपासून बलात्कार केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी चारजण हे पेशाने वकील आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घृणास्पद प्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या दोन महिलांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.आरोपींमध्ये अ‍ॅड. सतीश ऊर्फ गणेश मोरे, अ‍ॅड. उल्हास मोरे, अ‍ॅड. दीपक शहा व त्याची पत्नी अ‍ॅड. संगीता मोरे-शहा तसेच संगीताची आई अलकाबाई मोरे व संगीताचा मित्र निकुंज रावळ यांचा समावेश आहे. यापैकी केवळ सतीस मोरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. उर्वरित सर्व आरोपी फरार आहेत.कोळसेवाडी येथील वकील दीपक शहा यांच्याकडे ४५ वर्षांची ही महिला मोलकरीण म्हणून कामाला होती. दीपक यांची पत्नी संगीता याही वकील असून त्यांचे माहेर ओटी सेक्शन उल्हासनगर येथे आहे. तब्बल नऊ महिन्यांपूर्वी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत दीपक यांनी धमकावून अत्याचार केले. संगीता यांचे बंधू सतीश व उल्हास मोरे यांनीही मोलकरणीला धमकी देऊन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले. या अत्याचारांची माहिती मोलकरणीने संगीता व तिच्या आई अलकाबाई यांना दिली. त्यांनी या मोलकरणीला मदत करण्याऐवजी संगीताचा मित्र निकुंज रावळ याच्यासह दोन्ही भावांना अत्याचार करण्यास प्रोत्साहन दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराचे पुरावे म्हणून या मोलकरणीने लपून चित्रण केल्याचे पोलिसांना सांगितले.सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल होताच सहा पैकी पाच आरोपी फरार झाले. पोलीस पथक त्यांच्या मागावर आहेत, असे सूत्रांनी सांगितले. पोलीस उपायुक्तांची भेटगुन्ह्याचे गंभीर स्वरूप व त्यात वकिलांचा सहभाग पाहता पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला भेट देवून सविस्तर माहिती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट यांनी सहा आरोपींपैकी केवळ सतीश मोरे याला अटक केल्याचे सांगितले.