मुंबई : बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये कारागृहात असलेल्या आरोपीला न्यायालयात ओळखू नकोस, त्याच्या विरोधात साक्ष न देण्यासाठी शिवसेनेच्या शाखाप्रमुखाने अल्पवयीन पीडिता व तिच्या कुटुंबीयांना धमकावल्याची धक्कादायक घटना कांदिवलीत घडली आहे. २६ मार्चला घडलेल्या या घटनेप्रकरणी शाखाप्रमुखासह सहाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी अद्याप पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही. लालसिंग उर्फ लालूभाई राजपुरोहित, संजय राजणे, दिलीप गोडकर, विपीन सिंग यांच्यासह दोघा अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पीडितेवर बलात्काराची घटना २०१५ मध्ये घडली होती. कांदिवलीत राहात असलेल्या एका १३ वर्षांच्या मुलीला सुनील यादव या तरुणाने बाइकवरून फिरवून आणण्याच्या बहाण्याने एका लॉजवर नेऊन बलात्कार केला होता. याबाबत तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीला अटक करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे आरोपीचा समर्थक असलेला सेनेचा स्थानिक शाखाप्रमुख राजपुरोहित, हा त्याच्या साथीदारांसह पीडित मुलीच्या घरच्यांना तक्रार मागे घेण्यासाठी धमकवत होता, तसेच रिक्षाचालक ताजणे आणि गोडकर हे पीडित मुलीच्या घरी जाऊन त्यांना ‘केस मागे घ्या आणि कोर्टात यादवला ओळखत नाही, असे सांगा, नाहीतर तुमच्या मुलीसारखी तुमची अवस्था करू,’ अशा भाषेत दरडावत होता, याबाबत पीडितेच्या आईने पोलिसांना तक्रार दिली आहे.चौकशी सुरूया मुलीचे भाऊ रिक्षाचालक असून, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, केस मागे घेण्यास त्यांना रिक्षा चालवण्यासही मज्जाव करण्यात येत असल्याचे पीडित मुलीच्या आईचे म्हणणे आहे. मात्र, तेव्हा घाबरून त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली नाही. मात्र, २६ मार्च रोजी त्यांनी या प्रकरणी राजपुरोहित आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे.
बलात्कार पीडितेला साक्ष न देण्यासाठी धमकी, शिवसेना शाखाप्रमुखासह सहा जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:13 AM