Join us

कोरोना विषाणूत वेगाने बदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:07 AM

कोरोना विषाणूत वेगाने बदल!म्युटेशनच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ...

कोरोना विषाणूत वेगाने बदल!

म्युटेशनच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मात्र, तिच्याशी कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संबंध असल्याचे स्पष्ट होण्याइतक्या मोठ्या प्रमाणात हा प्रकार आढळलेला नाही, असे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. तरीही कोरोना विषाणूत वेगाने होणारा बदल भविष्यात घातक ठरू शकतो, त्यामुळे संसर्गाविषयी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.

कोरोना विषाणूच्या म्युटेशनविषयी विषाणूतज्ज्ञ डॉ. आदिल शहा यांनी सांगितले की, कोणत्याही विषाणूच्या उत्परिवर्तनाची प्रक्रिया ही अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक असते. त्यामुळे केवळ वैद्यकीय संशोधन व अभ्यासाचा भाग म्हणून सामान्यांनी याकडे पाहावे. घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांवर भर द्यावा, सहवासितांचा शोध घेण्यावर भर देऊन संसर्गाची साखळी तोडण्याची गरज आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्यास डबल म्युटंट व्हेरिएंट कारणीभूत नाही. या साथीला वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण सामान्य नागरिकांचा वाढता निष्काळजीपणा आहे. कोरोनाविषयी सामान्यांची बदललेली मनोवृत्ती अत्यंत घातक आहे. कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास कोरोना वाढणार हे लक्षात घ्यायला हवे. मात्र सध्या काही स्तरांवर देशात हर्ड इम्युनिटी येते, कोरोना साथीचा आजार म्हणून राहणार असे गैरसमज पसरविले जात आहेत, परंतु त्याला शास्त्रीय दाखला नाही. त्यामुळे कोरोनाच्या म्युटेशन प्रक्रियेचा ताण न घेता मास्कचा वापर, शारीरिक अंतर आणि स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी माहिती डॉ. समीर नायर यांनी दिली.

* डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हणजे काय?

डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हणजे एकाच व्यक्तीला कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटची लागण होते. जगातील पहिले असे प्रकरण ब्राझीलमध्ये आढळले होते. ब्राझीलमध्ये दोन रुग्णांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कोरोनाची लागण झाली होती.

* म्युटेशन म्हणजे काय?

म्युटेशन ही अशी क्रिया आहे ज्यात संबंधित विषाणू त्याच्याविरोधात केल्या जाणाऱ्या उपायांना दाद न देण्याच्या दृष्टीने स्वतःमध्ये काही जनुकीय बदल घडवून आणत असतो. म्युटेशन होण्यापूर्वीच्या विषाणूसाठी तयार केलेल्या लसीचा किंवा औषधाचा परिणाम म्युटेशन झालेल्या विषाणूवर होईलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे अशी म्युटेशन्स शोधण्याचे काम सुरू असते. म्युटेशन्स काही वेळा जास्त धोकादायक असू शकतात, तर काही म्युटेशन्स फारसे धोकादायक नसू शकतात. लस विकसित करून ती देण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. साहजिकच कोरोनाकडूनही स्वतःच्या बचावासाठी म्युटेशन्स सुरू आहेत.

.....................