बापरे! 11 वर्षांत विहिरीतून तब्बल 73 कोटींच्या पाण्याची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:42 PM2019-10-17T12:42:55+5:302019-10-17T12:57:51+5:30
चोरीच्या घटना या सातत्याने समोर येत असतात. मुंबईमध्ये विहिरीतील पाण्याच्या चोरीची चर्चा रंगली आहे.
मुंबई - चोरीच्या घटना या सातत्याने समोर येत असतात. मुंबईमध्ये विहिरीतील पाण्याच्या चोरीची चर्चा रंगली आहे. 11 वर्षांत विहिरीतून तब्बल 73 कोटींच्या पाण्याची चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विहिरीतून पाणी चोरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काळबादेवी येथील पांड्या मेन्शनच्या मालकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 11 वर्षांपासून टँकरवाल्यांच्या मदतीने तब्बल 73 कोटींचे पाणी चोरल्याचा आरोप पांड्या मेन्शनच्या मालकावर करण्यात आला आहे.
पाण्याची चोरी झाल्याची माहिती ही माहिती अधिकार कायद्यातून समोर आली आहे. पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेशकुमार धोका यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. पांड्या मेन्शनचे मालक त्रिपुरादास नानताल पांड्या आणि त्यांचे सहकारी प्रकाश पांड्या आणि मनोज पांड्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनी बेकायदेशीरपणे विहीर खणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
#Maharashtra: Mumbai's Azad Maidan police has registered FIR under sections 379 and 34 of Indian Penal Code against 6 persons for theft of groundwater valued around Rs 73.18 Crores over a period of 11 years; further investigation underway.
— ANI (@ANI) October 17, 2019
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांड्या यांनी दोन पंप लावून अवैध वीज जोडणीच्या मदतीने विहिरीतून पाणी काढले आहे. टँकर मालक व ऑपरेटर अरुण मिश्रा, श्रवण मिश्रा आणि धीरज मिश्रा यांच्या मदतीने पाण्याची विक्री करण्यात आली. 2006 ते 2017 दरम्यान तब्बल 73.19 कोटी रुपयांचे पाणी विकले असल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. तसेच आरोपींनी आतापर्यंत 6.10 लाख टँकर पाण्याची विक्री केली आहे. यातील प्रत्येक टँकरची क्षमता 10 हजार लिटरची असते. एका टँकरची किंमत 1200 रुपये असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.