दुर्मिळ घटना; जन्मतःच बाळाला आईमुळे झाली डेंग्यूची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 11:48 AM2017-10-05T11:48:48+5:302017-10-05T12:33:16+5:30
मुंबईमध्ये दुर्मिळ घटना घडली आहे.
मुंबई- मुंबईमध्ये अत्यंत दुर्मिळ अशी घटना घडली आहे. बाळ जन्माला येताना त्याला डेंग्यू झाला. आईला डेंग्यू झाल्यामुळे बाळाला डेंग्यू झाल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. बाळाच्या जन्माच्या वेळी त्याला जर डेंग्यूची लागण झाली आणि वेळेवर त्याचं निदान आणि उपचार झाले नाहीत, तर ती आई आणि बाळ दोघांसाठी गंभीर बाब असते, असं तज्ज्ञांचं मत आहे.
कुर्ल्याच्या रहिवाशी असणाऱ्या तस्फिया शेख (वय 36) यांना 11 सप्टेंबर रोजी खूप ताप आला होता तसंच त्यांच्या पोटात दुखत होतं. त्यावेळी त्या 37 आठवड्यांच्या गर्भवती होत्या. ताप येत असल्याने तस्फिया हॉस्पिटलमध्ये गेल्यावर गर्भातील बाळाच्या ह्रदयाचे ठोके वाढत असल्याचं डॉक्टरांना समजलं. त्यानंतर डॉक्टरांनी तस्फिया यांना सांताक्रुझमधील सिझेरीयन विभागात ठेवलं. दोन दिवसांनंतर तस्फिया यांनी मुलाला जन्म दिला. बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा त्याचं वजन 2 किलो 91 ग्रॅम इटकं भरलं. बाळामध्ये कुठल्याही आजारी लक्षण नसलेलं बाळ सुदृढ जन्माला आलं. पण जन्माच्या दुसऱ्या दिवशी त्याला ताप आला. त्याचदरम्यान बाळाच्या आईला डेंग्यू झाल्याचं निदान झालं.
व्यक्तीला डेंग्यूची लागण झाल्यावर त्याची लक्षणं दिसायला 3 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. जन्मानंतर 48 तासात बाळाला ताप आल्याने आईला डेंग्यू झाल्यामुळे बाळ जन्माला येताना त्यालाही डेंग्यूची लागण झाल्याचं लक्षात आलं, असं सुर्या हॉस्पिटलचे डॉक्टर नंदकिशोर काबरा यांनी सांगितलं. पण बाळाची पहिली डेंग्यू टेस्ट निगेटीव्ह आल्याचंही ते म्हणाले. पण त्या बाळाचा ताप न उतरल्याने डॉक्टरांनी पुन्हा पाचव्या दिवशी डेंग्यूची तपासणी केली असता ती पॉझिटीव्ह निघाली. बाळाचे प्लेटलेट काऊंट 90 हजारांपर्यंत (सर्वसाधारण प्लेटलेट काऊंट दीड ते चार लाख असतात) कमी झाले होते. डॉक्टर बाळाला तोंडातून लिक्टिड ड्रॉप्स देऊन प्रकृतीत सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस जास्त खराब होत होती. त्याच्या शरीरातील प्लेटलेट गरजेपेक्षा जास्त कमी झाल्या पण त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव होत नव्हता. बाळाची स्थिती बाराव्या दिवसानंतर हळूहळू सुधारू लागली. उपचारासाठी ते बाळ हॉस्पिटलमध्ये 17 दिवस होतं.
बाळाला पण डेंग्यू झाल्याने प्रत्येक दिवस आमच्यासाठी आव्हानात्मक होता. पण बाळाला योग्यवेळी उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला, असं तस्फिया शेख यांनी सांगितलं आहे. आईला डेंग्यू झाल्याने त्याची लागण बाळाला झाल्याची या वर्षातील ही पहिली घटना असल्याचं सुर्या हॉस्पिटलचे डॉक्टर भूपेंद्र अवस्थी यांनी म्हंटलं.
दुसरीकडे केईएम आणि वाडिया हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले की, जन्मजात बाळाला डेंग्यू झाल्याची घटना या वर्षात पाहिली नाही. सहा महिन्याआधी अशी घटना पाहिली होती. नाळेतून होणाऱ्या रक्तप्रवाहामुळे बाळाला डेंग्यूची लागण झाली. अशा घटना नेहमी ऐकायला येत नाहीत पण त्या सामान्यही नसतात, असं सायन हॉस्पिटलचे डीन डॉ. जयश्री मोंडकर म्हणाल्या आहेत.