१८६७ सालच्या दुर्मीळ पानांचे डिजिटलायझेशन
By admin | Published: December 5, 2014 01:28 AM2014-12-05T01:28:06+5:302014-12-05T01:28:06+5:30
दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ‘डिजिटल कॉर्नर’ प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचा श्रीगणेशा जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे.
मुंबई : दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ‘डिजिटल कॉर्नर’ प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचा श्रीगणेशा जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे. या टप्प्यात १८६७ सालच्या वीस हजार दुर्मिळ पानांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याकरिता सुमारे चार लाख रुपयांच्या निधी लागणार असून त्यासाठी ग्रंथप्रेमी, ग्रंथालयाच्या सभासदांनी, स्थानिक दुकानदारांनी त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक अरूण साधू, साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांसारख्या साहित्यविश्वातील अनेकांनी निधी संकलनासाठी हातभार लावला आहे.
१८६७ सालातील जुन्या साहित्याच्या तीन लाख पानांचा खजिना ग्रंथालयाकडे उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यातील तयार करण्यात येणाऱ्या डिजिटलायझेशन प्र्रक्रियेत ‘नीलदर्पण’, ‘नीतिसंग्रह’, ‘सारसंग्रह’, ‘हिंदुस्थानची प्राचीन आणि
सांप्रतची स्थिती या विषयीचा विचार’, ‘संस्कृत वाक्यरत्नावली’, ‘काशीखंड’ आणि ‘हिंदुस्थानाचा इतिहास’
अशा अनेक ग्रंथातून निवडक
ग्रंथातील २० हजार पाने तयार केली जातील.
या प्रकल्पासाठी निविदा मागविण्यात आली आहे. कारण हा प्रकल्प पूर्णत: तांत्रिक मुद्द्यांशी धरून आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळी या प्रकल्पात मार्गदर्शन करणार आहेत, असे ग्रंथालयाचे कार्यवाह प्रेमानंद भाटकर यांनी सांगितले. संपूर्ण प्रकल्प साधारणत: चाळीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी निधी संकलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आवाहन केले आहे.
विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचे योगदान या प्रकल्पास मिळत आहे. तसेच विविध संस्थाने, महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून, महालक्ष्मी, सिद्धीविनायक यांसारख्या ट्रस्टकडूनही प्रकल्पासाठी मदत घेणार आहोत. टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प यशस्वीपणे साकारणार असल्याचे भाटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)