लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ३५० व्या राज्याभिषेक सोहळा कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्र लवकरच पुस्तक स्वरुपात आणण्यात येणार आहेत. पुराभिलेख संचालनय या पुस्तक प्रकल्पावर काम करत असून नव्या वर्षात विद्यार्थी, वाचक आणि इतिहास संशोधकासांसाठी हे पुस्तक पर्वणी ठरणार आहे.
या पुस्तकात १६४६ ते १६७९ या कालावधीत शिवाजी महाराजांनी मोडी लिपीत लिहिलेल्या २८ मूळ पत्रांचे देवनागरी लिपीत भाषांतर करण्यात आले आहे. या पत्रांच्या भाषांतरामुळे ती इतिहास संशोधकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनीही समजू शकणार आहेत. या कॉफीटेबल पुस्तकाच्या प्रकल्पासाठी नुकतेच राज्य शासनाने २५ लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या पुस्तकात महारांजांची अनेक दुर्मिळ पत्रे आहेत. संभाजी महाराजांना रायगडावर सुखरुप पोहोचवल्याबद्दल राजांनी बक्षिस दिलेली सनद, सुभेदारास कडक ताकीद देणारे पत्र अशा प्रकारची अनेक पत्र या पुस्तकात आहेत. त्यामुळे इतिहासातल्या वेगवेगळ्या घडामोडी समोर येतात. मोडी भाषेतली पत्र , त्यांचे मराठी भाषांतर आणि पत्रांचा मराठी आणि इंग्रजी भाषेतला सारांश अशा स्वरुपात हे पुस्तक आहे.
पुराभिलेख संचालनालयाचे संचालक यांना प्रकल्पाचे कामे पूर्ण झाल्यानंतर त्यावरी प्रकल्पाचे उपयोगिता प्रमाणपत्र संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयास सादर करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. याखेरीस, राज्यातील १४ विद्यापीठांमध्ये मोडी लिपीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून ३५ लाख ८ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.