कांदिवली येथे चारकोपच्या रहिवाशी परिसरात आढळला दुर्मिळ प्रजातीचा ‘दुतोंड्या’ साप
By प्रविण मरगळे | Published: October 30, 2020 01:37 PM2020-10-30T13:37:21+5:302020-10-30T13:37:59+5:30
सेक्टर ८ येथील जिनय इमारतीच्या मागे असणाऱ्या वेदांत सोसायटीमध्ये हा साप आढळला, सर्पमित्र अजिंक्य पवार याने हा साप पकडला.
मुंबई – कांदिवलींच्या सेक्टर ८ परिसरातील चारकोप वेदांत या सोसायटीमध्ये दुर्मिळ जातीचा साप आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. रहिवाशी परिसरात हा साप आढळताच लोकांनी सर्पमित्रांना फोन करून बोलवून घेतले. मांडुळ प्रजातीचा ३ फूटाचा साप सोसायटीच्या आवारात सापडला. सर्पमित्र अजिंक्य पवार यांनी या सापाला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले.
सेक्टर ८ येथील जिनय इमारतीच्या मागे असणाऱ्या वेदांत सोसायटीमध्ये हा साप आढळला, सर्पमित्र अजिंक्य पवार याने हा साप पकडला. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे. मंद हालचाल,जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असं नाव आहे. लालसर तोंड व शेपटी आखूड.डोळे लहान,बाहुली उभी.जमिनीत राहणारा. तोंड शरीराच्या मानाने बारके असल्यामुळे मातीत,वाळूत सहज शिरता येते. भक्ष्याभोवती विळखा घालून भक्ष्याचा जीव गेल्यावर भक्ष्य गिळतो अशी या सापाविषयी माहिती अजिंक्यने सांगितली.
सर्पमित्राने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील वनक्षेत्रपाल विजय बाराते (RFO)यांच्या निदर्शनाखाली कार्यरक्षक वैभव पाटील प्राणी मित्र किरण रोकडे यांच्याकडे सापाला स्वाधीन केले.