Join us  

दुर्मीळ ठेवा काळाच्या पडद्याआड जाणार; एलिफंटा बेटावरील ऐतिहासिक तोफा दुर्लक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 6:04 AM

बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांच्या शिपायांनी लेण्या, शिल्पाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. त्यांच्या तोडफोडीचा खुणा अद्यापही कायम आहेत. एलिफंटा

मधुकर ठाकूरउरण : जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटावरील डोंगरमाथ्यावर इतिहासाची साक्ष देणाऱ्या ३० फुटी लांबीच्या दोन्ही तोफांकडे पुरातत्व विभाग, भारतीय नौदलाकडून अक्षम्य दुर्लक्षच केले जात आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर ऐतिहासिक ठेवा पडद्याआड जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शैवकालीन या लेण्यांमध्ये योगेश्वर शिव, रावणानुग्रहमूर्ती, शिवपार्वती, अर्धनारीनटेश्वर, गंगावतरण शिव, शिवपार्वती विवाह, अंधकारसुर वधमूर्ती, नटराज शिव आणि महेशमूर्ती अशी शिवाची विविध रूपे या  शिल्पात अद्भुत रीतीने कोरलेली आहेत.

तोफा १९ व्या शतकातीलबेट पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांच्या शिपायांनी लेण्या, शिल्पाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. त्यांच्या तोडफोडीचा खुणा अद्यापही कायम आहेत. एलिफंटा बेट ताब्यात घेतल्यानंतर बेटाच्या संरक्षणासाठी पोर्तुगीजांनी ३० फुटी लांबीच्या पोलादी दोन विशालकाय तोफा डोंगर माथ्यावर बसविल्या आहेत. मुंबईच्या दिशेने तोंड करून बसविलेल्या तोफा शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करण्यासाठी चहूबाजूला फिरविण्याची व्यवस्था होती. या तोफांच्या खाली मोठ्या खोल्या, भुयारे आहेत. तोफगोळे, शस्त्रसाठा, दारुगोळा ठेवण्यासाठी या दोन्ही भुयारांचा वापर केला जात असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही तोफांपैकी एका तोफेवर इ.स.१९०५ तर दुसऱ्या तोफेच्या मागील बाजूस १९०६ असे कोरले आहे. त्यामुळे या दोन्ही तोफा १९ व्या शतकाच्या सुरुवातीस बसविल्या असल्याचे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही या दोन्ही तोफा सुस्थितीत होत्या. त्यानंतर या दोन्ही तोफा नादुरुस्त झाल्या आहेत. तोफगोळे भरण्याच्या जागा दगडमातीने भरल्या आहेत. गोलाकार फिरणाऱ्या तोफांच्या बेअरिंग, पोलादी, पितळी अवशेष केव्हाच गायब झालेले आहेत. दोन्ही भुयारांचा वापर आता भटकी कुत्री, गुरेढोरे करू लागली आहेत. त्यामुळे भुयारे गुरेढोरांचे गोठे झाले आहेत. वटवाघळांच्याही वास्तव्यामुळे दुर्गंधी येत आहे. एलिफंटा बेटावरील डोंगर माथ्यावर कॅनन हिल पाॅइंट दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेला दिसून येत आहे.

टॅग्स :रायगड