‘सामाजिक बांधिलकीतून ‘रासेयो’ने पुढाकार घ्यावा’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 02:09 AM2020-08-21T02:09:33+5:302020-08-21T02:10:18+5:30
या प्रयत्नांना राष्ट्रीय सेवा योजनेची साथ मिळाली तर एक मोठे सामाजिक काम होऊ शकेल, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
मुंबई : कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक नागरिक आपल्या गावी आलेले आहेत. या सर्वांना आरोग्य व इतर सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना राष्ट्रीय सेवा योजनेची साथ मिळाली तर एक मोठे सामाजिक काम होऊ शकेल, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
आपली आणि इतरांची काळजी कशी घ्यावी याबाबत राष्ट्रीय सेवा योजना, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, युनिसेफ आणि राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग मुंबई विद्यापीठाद्वारे १६ आॅगस्ट २०२० रोजी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
या वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
माणसाच्या मनामनात उत्साह, प्रेरणा देणारा आणि सर्वांनी एकत्रित येऊन साजरा करण्याचा सण म्हणजे गणेशोत्सव. मात्र सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी हा सण काळजी घेऊनच साजरा करावा लागणार आहे. गावकरी आपापल्या गावी हा सण साजरा करण्यासाठी दाखल होत आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोविड-१९च्या लढ्यामध्ये केलेल्या कामाची प्रशंसा केली. पुढे ते म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात रासेयोने पुढे येऊन कार्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून विद्यापीठांनी आपत्ती व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
रासेयो (राष्ट्रीय सेवा योजना ) स्वयंसेवकांचे या कठीण परिस्थितीतील काम पाहून इतरांनाही काम करण्याचा जोम येतो हेच खरे सामाजिक कार्य आहे. सामाजिक बांधिलकी जपून रासेयो जे काम करते आहे त्या कामाचा मुंबई विद्यापीठाला गर्व असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके यांनी केले. महाराष्ट्र युनिसेफचे तज्ज्ञ मार्गदर्शक
डॉ. स्वाती महापात्रा, डॉ. खणेंद्र भुयान व डॉ. शैलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोविड काळात घ्यावयाची काळजी व त्याच्या प्रसारापासून समाजास सुरक्षित कसे ठेवावे याचे मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजनांची माहितीही स्वयंसेवकांना दिली़