म्हाडाची सोडत जाहीर, राशी कांबळे ठरल्या पहिल्या भाग्यवान विजेत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 11:29 AM2019-06-02T11:29:06+5:302019-06-02T13:11:25+5:30
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकिय लॉटरीला रविवारी (2 जून) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सुरुवात झाली आहे. सहकार नगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची पहिली लॉटरी काढण्यात आली.
मुंबई - म्हाडाच्यामुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकिय लॉटरीला रविवारी (2 जून) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सुरुवात झाली आहे. सहकार नगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची पहिली लॉटरी काढण्यात आली. यामध्ये राशी कांबळे या पहिल्या भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाईटवरून केले जात आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, मुंबई मंडळाचे मधू चव्हाण, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
गिरणी कामगारांसाठी म्हाडाने खूशखबर दिली आहे. सेन्च्युरी, श्रीनिवास मिलच्या कामगारांसाठी 3800 घरांची ऑगस्टमध्ये लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या 217 सदनिकांच्या लॉटरीला सुरुवात झाली आहे. सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे http://lottery.mhada.gov.in आणि http://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहेत. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटाकरिता 170 सदनिका व मध्यम उत्पन्न गटाकरिता 47 सदनिकांचा समावेश आहे.
मुंबईतील 217 सदनिकांची लॉटरी 21 एप्रिलला जाहीर होणार होती. मात्र, लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता असल्याने ती पुढे ढकलण्यात आली होती. या घरांसाठी तब्बल 78 हजार 773 जणांनी अर्ज केले होते. मात्र, त्यापैकी 66 हजार 99 जण पात्र ठरले. या लॉटरीमध्ये शेल टॉवर चेंबूर आणि कोपरी-पवई येथील 217 घरांचा समावेश आहे.
म्हाडाच्या 276 दुकानांचा शनिवारी ई-लिलाव होणार असून, मुंबई मंडळांतर्गत असलेल्या प्रतीक्षानगर (सायन), न्यू हिंद मिल-माझगाव, विनोबा भावेनगर-कुर्ला, स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे मंडाले-मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा-मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्रीनगर-गोरेगाव, सिद्धार्थनगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी- मालाड येथील 201 गाळ्यांचा समावेश आहे. तर कोकण मंडळांतर्गतच्या विरार बोळिंज, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथील 77 सदनिकांचा समावेश आहे. रविवारी सोडतीचा निकाल पाहण्यासाठी म्हाडा भवनमध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता म्हाडाने चोख व्यवस्था ठेवली आहे.